वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द गावचे सुपुत्र व माहेश्वरी अंधशाळेचे अंध शिक्षक शंकर मुतगेकर यांना आयडीअल अंध संस्था बेंगळूर यांच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल कंग्राळी खुर्द येथील श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळाच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष हभप शट्टूप्पा पाटील होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती मुतगेकर, मंडळाचे कार्यदर्शी आनंद आंबेवाडी, रामा निलजकर, प्रकाश बाळेकुंद्री, महादेव पाटील, एम. वाय. पाटील उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष शट्टूप्पा पाटीलसह मंडळाच्या वारकऱ्यांच्या हस्ते मुतगेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराबद्दल हभप शंकर मुतगेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाला श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळाचे वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.









