टॉप थ्री’मध्ये ऑस्ट्रेलिया, थायलंडला स्थान
► वृत्तसंस्था/ एल साल्वाडोर
निकारागुआची सौंदर्यवती शेनिस पॅलासिओस हिने 2023 च्या ‘मिस युनिव्हर्स’ किताबावर आपले नाव कोरले. 72 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा एल साल्वाडोर येथील जोस अडोल्फो पिनेडा एरिना येथे आयोजित करण्यात आली होती. येथे मिस युनिव्हर्स 2022 ची विजेती आर्बोनी गॅब्रिएलने शेनिस हिला मिस युनिव्हर्सचा मुकुट घातला. निकारागुआ, ऑस्ट्रेलिया आणि थायलंडने पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले. भारतीय स्पर्धक श्वेता शारदा उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यामुळे ‘टॉप 20’ मध्ये होती, पण तिला अव्वल स्थान मिळवता आले नाही.
मिस युनिव्हर्स 2023 चा भव्य कार्यक्रम 19 नोव्हेंबर रोजी एल साल्वाडोर येथे पार पडला. यावेळी मिस युनिव्हर्स 2023 च्या विजेतेपदाची घोषणा करण्यात आली. शेनिस पॅलासिओसची विजेती म्हणून निवड झाली आणि मिस युनिव्हर्स 2023 चा ताज जिंकला. शेनिस पॅलासिओस ही निकारागुआची असून याआधी तिने मिस निकारागुआचा किताब पटकावला होता. मिस युनिव्हर्स जिंकणारी शेनिस पॅलासिओस ही निकारागुआची पहिली सौंदर्यवती ठरली आहे. या सौंदर्य स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची मोराया विल्सन आणि थायलंडची अँटोनिया पोर्सिल्ड ह्या उपविजेत्या ठरल्या.
श्वेता शारदाने केले भारताचे प्रतिनिधित्व
यावषी चंदीगडमध्ये जन्मलेल्या श्वेता शारदाने मिस युनिव्हर्स 2023 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तिने टॉप 20 फायनलिस्टमध्ये स्थान मिळवले, परंतु तिला टॉप 10 मध्ये स्थान मिळवता आले नाही. यावषी पाकिस्ताननेही पहिल्यांदा मिस युनिव्हर्समध्ये पदार्पण केले.
विजयाच्या क्षणी शॅनिस झाली भावूक
मिस युनिव्हर्स जिंकल्यानंतर शॅनिस पॅलासिओस भावूक होताना दिसली. तिचे डोळे भरून आले आणि ती देवाचे आभार मानताना दिसली. तिने पांढऱ्या रंगाचा शिमरी स्टोन वर्क गाऊन घातला होता. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शेनिसने अँटोनिया पोर्सिल्डचा हात धरलेला दिसला. तिचे नाव घोषित होताच ती आश्चर्याने रडू लागली. दरम्यान, उपविजेती ठरलेली अँटोनिया पोर्सिल्ड थोडी निराश दिसली.
यंदा 72व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत 84 देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला. एकमेकांविरुद्ध अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळाली. अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट जीनी माई आणि मिस युनिव्हर्स 2012 ऑलिव्हिया कल्पो व्यतिरिक्त अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट मारिया मेनुनोस यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.









