स्टुडंट ऑफ द ईयर 3 मध्ये वर्णी
बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया बॉलिवूड पदार्पणाच्या तयारीत आहे. शनाया लवकरच मल्याळी चित्रपटांचे सुपरस्टार मोहनलाल यांच्या ‘वृषभ’ चित्रपटात दिसून येणार आहे. याचदरम्यान शनाया ओटीटीवरही पदार्पण करणार असल्याचे समजते. करण जौहरच्या सर्वात मोठ्या फ्रँचाइजीत तिला संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.
करण जौहर ‘स्टुडंट ऑफ द ईयर 3’च्या तयारीत आहे. यावेळी हा चित्रपट चित्रपटगृहात नव्हे तर ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो. करण जौहर या नव्या चित्रपटात शनाया कपूरसोबत आणखी काही नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे समजते.

स्टुडंट ऑफ द ईयर 3 चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू आहे. लवकरच या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले जाणार आहे. परंतु याप्रकरणी अद्याप निर्माते अणि शनाया कपूरकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
‘बेधडक’ हा चित्रपट यापूर्वी घोषित करण्यात आला होता, परंतु त्यासंबंधी पुढे काहीच न घडल्याने शनायाचे पदार्पण लांबणीवर पडले आहे. परंतु करण जौहरने हा चित्रपट निर्माण केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
स्टुडंट ऑफ द ईयर फ्रँचाइजीचे दोन चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटातून वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्टने 2012 मध्ये बॉलिवूड पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. तर दुसरा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला, यातून तारा सुतारिया अन् अनन्या पांडेने पदार्पण केले होते.









