वृत्तसंस्था/ दुबई
आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ क्षेत्रामध्ये ग्रँडमास्टर किताब मिळविणारा पी. शामनिखिल हा भारताचा 85 वा ग्रँडमास्टर ठरला आहे. नुकत्याच येथे झालेल्या दुबई पोलिस मास्टर्स बुद्धीबळ स्पर्धेत शाम निखिलने आपला सहभाग दर्शविला होता. त्याने या स्पर्धेत तिसरा आणि शेवटचा ग्रँडमास्टर नॉर्म मिळविला.
वयाच्या आठव्या वर्षापासून शामनिखिलने बुद्धीबळ क्षेत्रामध्ये प्रवेश केला. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याच्या कामगिरीत सातत्य राखले गेले. गेली 12 वर्षे ग्रँडमास्टर किताब मिळविण्यासाठी शामनिखिलचे प्रयत्न सुरु होते. दुबईतील स्पर्धेत शामनिखिलला ग्रँडमास्टर किताब मिळविण्यासाठी केवळ एका ग्रँडमास्टर नॉर्मची गरज होती. त्याने या स्पर्धेत केवळ एक सामना जिंकला असून 8 सामने बरोबरीत सोडविले आहेत. 31 वर्षीय पी. शामनिखिलला 2500 किलो मानांकन गुण मिळाले आहेत.









