चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
बिग बॉसच्या सीझन 15 दरम्यना प्रेक्षकांकडून मोठय़ा प्रमाणात प्रेम प्राप्त करणारी अभिनेत्री शमिता शेट्टी लवकरच ‘द टेनेंट’ चित्रपटात दिसून येणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये शमिताला दृढनिश्चयी महिलेच्या भूमिकेत दर्शविण्यात आले आहे. शमिताने या चित्रपटाचा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.
“अखेर मी येथे पोहोचली आहे., आमच्यापैकी अनेक लोक स्वतःच्या जीवनाच्या कुठल्या न कुठल्या टप्प्यावर प्रवास करत आहेत. समाजाला महिला नेहमीच चुकीची असते असे वाटते, तसेच महिलांच्या जीवनासंबंधी निर्णय घेणाऱयांची यादीही मोठी असते’’ असे शमिताने टीझरच्या कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये अहंकाराच्या प्रभावाने भरलेल्या समाजात एकटय़ाने राहणारी एक युवती स्वतःच्या बळावर स्वतंत्र राहते असे दर्शविण्यात आल्याचे शमिताने म्हटले आहे. द टेनेंट हा चित्रपट माझ्यासाठी अनेकार्थाने विशेष आहे. हा चित्रपट म्हणजे माझ्यासाठी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचे एक माध्यम असल्याचे तिचे म्हणणे आहे.
शमिता ही शिल्पा शेट्टीची बहिण आहे. शमिताचे अनेक चित्रपट यापूर्वी प्रदर्शित झाले असले तरीही फारसे गाजलेले नाहीत. शमिताला चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करता आलेले नाही. शमिता मागील काही काळापासून मोठय़ा पडद्यावर झळकलेली नाही. याचमुळे द टेनेंट या चित्रपटाकडून तिला मोठय़ा अपेक्षा आहेत.









