वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेतील सहभाग हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या तंदुरुस्तीविषयक अंतिम तपासणीवर अवलंबून असेल, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेदरम्यान पावलाला दुखापत झालेला शमी सध्या बेंगळूर येथील एनसीएमध्ये सावरत आहे.
शमीने त्याच्या सावरण्याच्या प्रक्रियेत लक्षणीय प्रगती केली असून त्याने गेल्या महिन्यात पुन्हा गोलंदाजी सुरू केली आहे. तो त्याच्या गोलंदाजीचा ताण सतत वाढवत चाललेला आहे आणि त्याला कोणतीही वेदना होत नाही. ही बाब स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमनाच्या दृष्टीने चांगली आहे. ‘शमी ऑस्ट्रेलियातील मालिका खेळेल की नाही हा त्याच्या फिटनेसवर अवलंबून असलेला मुद्दा आहे आणि एनसीएच्या अहवालानंतर निर्णय घेतला जाईल’, असे शाह यांनी सांगितले आहे. हे विधान दाखवून देते की, की शमीचा सदर मालिकेतील सहभाग हा तो कसा सावरतो त्यावर पूर्णपणे अवलंबून आहे.
ऑस्ट्रेलियातील शमीची कामगिरी भारतीय संघासाठी त्याचे महत्त्व काय आहे ते दाखवून देते. त्याने आठ कसोटींमध्ये 32.16 च्या सरासरीने 31 बळी घेतलेले आहेत. यामध्ये दोन वेळा मिळविलेल्या पाच बळींचा समावेश होतो. ऑस्ट्रेलियन परिस्थितीचा फायदा उठवण्याची त्याची क्षमता त्याला महत्त्व प्राप्त करून देते. कारण भारताने ऑस्ट्रेलियन भूमीवर बॉर्डर-गावस्कर चषक पुन्हा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.









