वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी लवकरच ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात मोहम्मद शमीचा भारतीय संघात समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
भारतामध्ये झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर मोहम्मद शमी दुखापतीमुळे जवळपास वर्षभर क्रिकेटपासून अलिप्त राहिला होता. त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्याला विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मध्यंतरी त्याच्या गुडघ्याला सूज आल्याने त्याचे क्रिकेटमधील पुनरागमन लांबले गेले. सध्या त्याची ही दुखापत आता पूर्णपणे बरी झाली असून तो सय्यद मुस्ताकअली क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. बेंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील वैद्यकीय पथक शमीच्या तंदुरुस्तीची पुन्हा चाचणी घेईल. पण आता तो पूर्णपणे फिट असल्याचे डॉ. नितीन पटेल यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत उर्वरित सामन्यात मोहम्मद शमीची भारतीय संघाला चांगलीच गरज भासत असल्याने तो लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याचे समजते. या मालिकेतील तिसरी कसोटी 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे तर चौथी कसोटी 26 डिसेंबरपासून मेलबोर्नमध्ये होणार आहे. शमी या मालिकेतील शेवटच्या दोन कसोटीत खेळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.









