वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या जून महिन्यात अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमान पदाने होणाऱ्या आयसीसीच्या पुरूषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा हुकमी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. मोहम्मद शमीचे क्रिकेटमधील पुनरागमन सप्टेंबर महिन्यात बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
33 वर्षीय मोहम्मद शमीच्या दुखापत झालेल्या घोट्यावर अलिकडेच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान ही दुखापत पूर्ण बरी होण्यासाठी शमीला आणखी बरेच दिवस विश्रांती घेण्याच सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे तो आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळू शकणार नाही. पण भारतात होणाऱ्या सप्टेंबर अखेरीच्या बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत शमीच्या पुनरागमनाची शक्यता वर्तविली जात आहे. मोहम्मद शमीला या दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळता आले नाही. तसेच त्याला आयपीएल स्पर्धाही हुकणार आहे. मोहम्मद शमीने आपला शेवटचा सामना आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळला होता. येत्या सप्टेंबर महिन्यात बांगलादेशचा संघ भारतात येणार असून उभय संघात 2 कसोटी सामने आणि 3 टी-20 सामने खेळविले जाणार आहेत.









