वृत्तसंस्था / कोलकाता
भारताचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 2025 च्या आयपीएल स्पर्धेनंतर दुखापतीमुळे क्रिकेटपासून अलिप्त राहिल्याने त्याला सध्या सुरू असलेला इंग्लंडचा दौराही हुकला. दरम्यान आगामी राष्ट्रीय क्रिकेट हंगामासाठी बंगाल संघाने 50 संभाव्य क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली असून त्यात मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला आहे.
बंगाल क्रिकेट संघटनेने शनिवारी आगामी राष्ट्रीय क्रिकेट हंगामासाठी 50 संभाव्य क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली. यामध्ये वेगवान गोलंदाज आकाशदीप आणि अभिमन्यु ईश्वरन यांचा समावेश करण्यात आला आहे. बंगाल संघाच्या कर्णधारपदी पुन्हा मुकेशकुमार किंवा अनुस्तुप मुजुमदार यापैकी एकाची निवड केली जाईल. मोहम्मद शमीची दुखापत आता पूर्णपणे बरी होण्याच्या मार्गावर आहे. बंगालच्या यादीमध्ये अष्टपैलु शहबाज अहम्मद, यष्टीरक्षक आणि फलंदाज अभिषेक पोरल यांनाही संधी मिळाली आहे. निवडण्यात आलेल्या संभाव्य 50 क्रिकेटपटूंच्या चमुसाठी सरावाचे शिबिर लवकरच घेतले जाईल. या शिबिराची तारीख आणि ठिकाण नंतर जाहीर करण्यात येईल. बंगाल संघामध्ये शमीचा समावेश झाल्याने त्याचे स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होण्याचे संकेत मिळाले आहे. 33 वर्षीय शमीने आतापर्यंत 64 कसोटी, 108 वनडे आणि 25 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. चालु वर्षीच्या प्रारंभी झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत शमीचा भारतीय संघात समावेश होता. या स्पर्धेचे जेतेपद भारताने मिळविले. शमीने या स्पर्धेत पाच सामन्यांतून 9 गडी बाद केले. भारताने या स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत अंजिंक्यपद पटकाविले. 2025-26 च्या क्रिकेट हंगामाला 28 ऑगस्टपासून पारंपरिक आंतरविभागीय दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेने प्रारंभ होत असून शमी या स्पर्धेत खेळेल, असे सांगण्यात आले.









