आर्थिक संकटादरम्यान पाकिस्तान पंतप्रधानांची कबुली
@ वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तान सध्या सर्वात गंभीर आर्थिक संकटाला सामोरा जात आहे. देशाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पाकिस्तानला अन्य देशांसमोर हात पसरावे लागत आहेत. एका अण्वस्त्रसज्ज देशाला स्वतःच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेमुळे वारंवार मदतीसाठी हात पसरावे लागणे लाजिरवाणी बाब असल्याचे वक्तव्य पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले आहे.
पाकिस्तानसाठी कर्ज मागण्याप्रकरणी मला लाज वाटते. अन्य देशांकडून कर्ज घेत पाकिस्तानच्या आर्थिक आव्हानांवर तोडगा काढणे योग्य पद्धत नाही, कारण हा पैसा संबंधित देशांना परत देखील करावा लागणार असल्याचे पंतप्रधान शाहबाज यांनी पाकिस्तान प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱयांना संबोधित करताना म्हटले आहे.
अलीकडेच संयुक्त अरब अमिरातच्या दौऱयादरम्यान तेथील अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद यांनी पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचे अतिरिक्त कर्ज देण्याची घोषणा केली होती. या आर्थिक सहाय्यासाठी आम्ही जायद यांचे आभार मानतो असे शरीफ यांनी म्हटले आहे.
अन्य मित्रदेशांकडून अपेक्षा
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबतची (आयएमएफ) चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचण्यापूर्वी पाकिस्तान आर्थिक संकट दूर करण्यासाठी अन्य मित्र देशांशी आर्थिक मदतीसंबंधी संपर्क साधण्याचा विचार करत आहे. देशातील राजकीय समस्येमुळे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला धक्का पोहोचत आहे. यामुळे धोरणनिर्मात्यांना आयएमआय कार्यक्रमासाठी आवश्यक पर्याय निवडणे अवघड ठरल्याचे अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले आहे.
सरकारकडे नाही अधिक वेळ
स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमधील (एसबीपी) विदेशी चलनसाठा वेगाने घेत असल्याने सरकारकडे काम करण्यासाठी अधिक वेळ नाही. 6 जानेवारीपर्यंत एसबीपीकडे असलेला विदेशी चलनसाठा केवळ 4.3 अब्ज डॉलर्स इतका होता. तर वाणिज्यिक बँकांचा विदेशी चलन साठा 5.8 अब्ज डॉलर्स इतका होता. यामुळे देशातील विदेशी चलन भांडार एकूण 10.18 अब्ज डॉलर्स झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मागील 12 महिन्यांमध्ये पाकिस्तानच्या विदेश चलनसाठय़ात 12.3 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. मागील वर्षी 22 जानेवारी रोजी विदेशी चलनसाठय़ाचे प्रमाण 16.6 अब्ज डॉलर्स होते. सौदी अरेबियासारखे मित्रदेश पाकिस्तानला अतिरिक्त 2 अब्ज डॉलर्सची मदत करण्याचा विचार करत आहेत. यासंबंधीच्या निर्णयाकरता सौदी अरेबिया किती वेळ घेणार हे अद्याप स्पष्ट नाही. पाकिस्तानात आयएमएफच्या समीक्षा मोहिमेच्या दौऱयाचीही अद्याप पुष्टी झालेली नाही.









