प्रतिनिधी / पणजी
ज्येष्ठ साहित्यिक, माजी प्रभारी सभापती आणि समाजोन्नती संघटनेचे अध्यक्ष शंभू भाऊ बांदेकर यांना पुणेस्थित महाकवी कालिदास प्रतिष्ठानतर्फे आयोजित महाकवी कालिदास जयंती कार्यक्रमात पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
धायरी-पुणे येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. सातपुते आणि प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे संचालक काकासाहेब चव्हाण यांच्याहस्ते श्री. बांदेकर यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर शिक्षणतज्ञ डॉ. न. म. जोशी प्रमुख अतिथी व प्राचार्य सु. द. वैद्य खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
श्री. बांदेकर यांनी उत्तरादाखल केलेल्या भाषणात सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सांगितले, ‘गोव्यातील सत्तरी तालुक्यातील आंबेडे-धावे या ग्रामीण भागातून धायरीची पायरी गाठून पं. महादेवशास्त्राr जोशी यांनी भारतीय संस्कृती कौशल्ये व कृषिविषयक संशोधनाचे अद्वितीय कार्य केले व गोवा मुक्तिलढ्यात सुधाताई जोशी यांनी जे महत्वपूर्ण योगदान दिले, त्यांच्या धायरी या कर्मभूमीत या दांपत्याला नम्रपणे अभिवादन करून हा सन्मान स्वीकारत आहे.
प्रमुख अतिथी डॉ. जोशी, खास निमंत्रित प्राचार्य वैद्य आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. महेंद्र ठाकूरदास यांची महाकवी कालिदास यांच्या संपूर्ण साहित्यावर विस्तृत भाषणे झाली. प्रतिष्ठानच्या ऋचा कर्वे यांनी आभार मानले. कार्यक्रमास साहित्यिक, कवी आणि शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.









