अध्याय एकोणिसावा
यमनियमाबद्दल सांगताना भगवंत उद्धवाला म्हणाले, अहिंसा, सत्य, चोरी न करणे आसक्ती नसणे, लज्जा, असंग्रह, आस्तिकता, ब्रह्मचर्य, मौन, स्थिरता, क्षमा आणि अभय हे ‘यम’ होत. तर अंतःशुद्धी, बहिःशुद्धी, जप, तप, हवन, श्रद्धा, अतिथिसेवा, माझे पूजन, तीर्थयात्रा, परोपकार, संतोष आणि गुरूसेवा, हे ‘नियम’ आहेत. जे लोक यांचे पालन करतात, त्यांना हे त्यांच्या इच्छेनुसार फळे देतात. ह्यालाच शास्त्रार्थात ‘परमगुह्य’ असे म्हणतात. ह्यांची उपासना कोणी पुरुष कामना धरून करील, तर हे यम व नियम कामधेनूप्रमाणे त्याच्या सर्व कामना पूर्ण करतील किंवा ह्याच यम-नियमांची निष्कामपणे उपासना केली, तर त्या पुरुषाला माझ्या निजधामाची म्हणजे स्वरूपाची सहज प्राप्ती होईल. आता उद्धवा! शमदमादिकाबद्दल तुझे जे प्रश्न आहेत, ते गुह्य निरूपणही तुला सांगतो त्याकडे लक्ष दे. ते लक्षपूर्वक श्रवण केले असता तात्काळ ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. हेच त्यातील अत्यंत गुह्य व श्रे÷ प्रमाण आहे. बालकाची भूक भागविण्याकरिता त्याला आई आपल्या हाताने घास देत असते, त्याप्रमाणेच श्रीकृष्णही उद्धवाला ब्रह्मज्ञान देत आहेत.
जो रस बापाला गोड लागतो, तो आपल्या मुलालाही तो पाजतो. अगदी त्याप्रमाणेच श्रीकृष्ण उद्धवाला ब्रह्मरस देत आहेत. आधीच पाऊस पडत असावा, त्यात त्याला वारा आणि वीज यांची साथ मिळाली तर मग काही बघायलाच नको. त्याची वृष्टि अनिवार होऊन त्या पाण्याचा पूर पृथ्वी अगदी खणून काढून वाहात असतो. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान देण्याला उद्धवाच्या प्रश्नाचे निमित्त झाले, त्यामुळे श्रीकृष्ण स्वानंदाने प्रसन्न झाले व ते आता पूर्ण ब्रह्मच त्याच्या स्वाधीन करीत
आहेत.
फुकट मिळणारे मिठाचे खडे देऊन जर चिंतामणि हाती येऊ लागला, किंवा वीट देऊन जर परिस मिळाला, तर कोण स्वीकारणार नाही? हमखास ब्रह्मज्ञान देऊ करणाऱया, उद्धवाच्या शमदमादिकांच्या प्रश्नांना उत्तर देताना भगवंत म्हणाले, बुद्धी माझ्या ठायी स्थिर करणे म्हणजेच ‘शम’ होय. यासाठी इतर कोणत्याही इच्छा, वासना मनात येऊन उपयोग नाहीत. म्हणून इंद्रिय संयम आवश्यक आहे. इंद्रियांच्या संयमाचे नाव ‘दम’ आहे. दुःख सहन करण्याला ‘तितिक्षा’ म्हणतात जीभ आणि जननेंद्रिय यांच्यावर विजय मिळवणे हेच ‘धैर्य’ होय. समुद्रात मीठ जाऊन मिळाले की ते समुद्रस्वरूपच होऊन राहते, त्याप्रमाणे बुद्धी माझ्याठायी स्थिर करण्याच्या निश्चयाने ती चैतन्यघन होऊन जाते. अशा प्रकारे बुद्धीला शांतस्वरूप प्राप्त होणे यालाच ‘शम’ म्हणावे पण ह्यापूर्वीच दम करावा लागतो. कसा ते सांगतो. दम म्हणजे इंद्रियांना ताब्यात ठेवणे बुद्धी माझ्याठायी स्थिर होण्यासाठी म्हणजे शमासाठी इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवावे लागते. त्यासाठी शास्त्राsक्तविधीशिवाय कोणताही भोग त्यांना द्यावयाचा नाही. रात्रंदिवस वैराग्याने त्यांना आवरून धरावयाचे.
आतां तितिक्षेचेही संपूर्ण लक्षण सांगतो ऐक. मोठे सुख प्राप्त झाले असता ते ज्या उल्हासाने उपभोगतो, त्या उल्हासानेच दुःखही सहन करतो. प्रकाश येवो किंवा अंधार येवो, त्यांना आकाश जसे समसमानभावाने अंगावर धरते त्याप्रमाणे सुखदुःखाचे प्रकारही अविकृतपणाने सहन करतो. देहाची अहंता सोडून सुखदुःखाच्या पलीकडे आपणाला पाहाणे, हीच येथे ‘तितिक्षा’ होय. स्वप्नांतील दारिद्र्य़ आणि वैभव ही दोन्ही जागृतीमध्ये मिथ्या वाटतात, त्याप्रमाणे सुखदुःखाहून आपले स्वरूप निराळे आहे हे ओळखणे याचंच नांव तितिक्षा होय.
जिव्हा आणि जननेंद्रिय ह्यांना संपूर्णपणे ताब्यात ठेवणे यालाच, धृति म्हणतात. कृष्णसर्प जसा हातात धरावा, तशी ही दोन्ही इंद्रिये नेहमी ताब्यात ठेवावीत. यत्किंचित ढिली सोडली तर ती उलटून धरणाऱयालाच खाऊन टाकतात.
जे कनक कांतेवर आसक्त असतात, त्यांच्यापाशी ही धृती कधी रिघावयाची नाही. उलट द्रव्य व दारा म्हणजे स्त्रियांच्या ठिकाणी जो अनासक्त असतो त्याच्या घरी ही धृती पोसणी होऊन पडलेली असते.







