‘तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात’
कोल्हापूर/ सिध्दनेर्ली : उभ्या पिकांवरून जाणारा शक्तीपीठ महामार्ग नकोच, असा एल्गार करत कोगील बुद्रुक (ता. करवीर) येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी शेतात तिरंगा फडकवत शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध दर्शविला. शक्तीपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्यावतीने स्वातंत्र्यदिनी ‘तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात’ हे अभिनव आंदोलन केले.
काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोगील बुद्रुक येथे महिला शेतकरी सुशीला पाटील यांच्या शेतात हे आंदोलन झाले. ज्या शेतातून शक्तीपीठ जात आहे, त्या शेतात तिरंगा झेंडा लावून शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नकोच, असा संदेश सरकारला देण्यात आला.
पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत खर्डा–भाकरी खाऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचाही निषेध केला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, सम्राट मोरे, शिवाजी मगदूम, माजी जि. प. सदस्य शशिकांत खोत, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, प्रकाश पाटील, यांच्यासह संजय बामणकर, भैरवनाथ ताकमारे, निवास ताकमारे, तानाजी ताकमारे, अनिल कांबळे, सदाशिव चौगले, आनंदा बनकर, सुशिला पाटील, पारूबाई म्हाकवे, राजू घराळ, आनंदा कोळेकर, रामा चव्हाण, प्रवीण बीडकर, निशांत पाटील, अर्जुन इंगळे, अमन शिंदे, सागर पाटील, आण्णासो बोडके, अनिल मुळीक यांच्यासह शक्तीपीठ बाधिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकोंडीतही शेतकरी उतरले शेतात
एकोंडी (ता. कागल) येथेही शेतकऱ्यांनी शेतात तिरंगा ध्वज लावून आंदोलन केले. आमदार सतेज पाटील, विजयराव देवणे, सम्राट मोरे, शामराव देसाई, सचिन घोरपडे, शशिकांत खोत, प्रकाश पाटील, कॉ. शिवाजी मगदूम, दादासो पाटील, आनंदा पाटील, सागर कोंडकर, प्रा. सुनिल मगदूम, मल्हार पाटील, संतोष पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
मुश्रीफांनी शब्द पाळावा
विधानसभा निवडणुकीच्या काळात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ रद्द करण्याचा शब्द दिला होता. हा शब्द त्यांनी पाळावा, अशी मागणीही सतेज पाटील यांनी केली.
शेतात पाय ठेवू देणार नाही
मोजणीसाठी येणाऱ्या अधिकऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा सुशीला पाटील यांनी यावेळी दिला. आम्ही खर्डा–भाकरी खात असताना आमच्या जमिनी घेऊन सरकार कोणाचे भले करणार आहे? असा सवालही त्यांनी केला.
कितीही आमिष दाखवा, एक इंचही जमीन सोडणार नाही
गारगोटी: काहीही झाले तरी शक्तीपीठ महामार्ग शेतातून जाऊ देणार नाही. सरकारने कितीही रुपयांचे आमिष दाखवले तरी आम्ही पैसे घेणार नाही, आम्हाला आमची शेतीच हवी आहे, असा निर्धार व्यक्त करत शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी स्वातंत्र्य दिनी गारगोटी येथील दौलत शिंदे यांच्या शेतात तिरंगा ध्वज फडकावत अनोखे आंदोलन केले.
जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणांनी संपूर्ण शिवार दणाणून गेला. सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, राहुल देसाई, जीवन पाटील, सम्राट मोरे, सचिन घोरपडे, मधुआप्पा देसाई, शामराव देसाई, मच्छिंद्र मुगडे, सरपंच प्रकाश वास्कर, शिवराज देसाई, शंभूराजे देसाई, रामभाऊ कळबेकर, नंदकुमार मोरे, दीपक देसाई, म्हसवे गावचे शरद देसाई, अनिकेत देसाई, बजरंग साळवे यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








