कोल्हापूर :
शेतकऱ्यांचा विरेध असल्यास त्यांचा विरोध डावलून कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गा होणार नसल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून अधिवेशनामध्येही याबाबत आवाज उठवणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत गुरुवारी मंत्री मुश्रीफ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री मुश्रीफ यांना शक्तीपीठ महामार्गाबाबत विचारले असता ते म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच आढावा घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीबाबत येथील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाबाबत सकारात्मक असल्याचे चित्र दाखविण्यात आले होते. मात्र माझ्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध आहे. लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्गाचा फटका बसला असल्याचे सांगितले. यावर कोल्हापूरमधील शेतकऱ्यांसह जनतेचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्यास त्यांचा विरोध डावलून महामार्ग होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने शासनाकडे सादर केला आहे. प्रस्तावामध्ये हद्दवाढीत 18 गावांचा समावेश केला आहे. शहराच्या विकासासाठी हद्दवाढ होणे गरजेचे आहे. यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. तसेच अधिवेशामध्येही हद्दवाढीबाबत विचारणा करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
- शक्तीपीठ, हद्दवाढबाबत अधिवेशनात आवाज
शक्तीपीठ महामार्ग, हद्दवाढीबाबत मंत्री मुश्रीफ यांना विचारले असता त्यांनी जिल्ह्यातील दोन लोकप्रतिनिधी शक्तीपीठबाबत सकारात्मक आहेत. मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री यांनी नुकतेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची शक्तीपीठबाबत म्हणणे जाणून घेतले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध असल्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कळविले आहे. त्यानुसार शेतकरी, जनतेचा विरोध डावलून महामार्ग होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. शहराची हद्दवाढ होण्यासाठी अधिवेशनातही आवाज उठवणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.








