सर्व गाळ व मातीचा भराव नदीमध्ये मोठ्या प्रमाणात साचणार आहे
माणगांव : नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गातील माणगांव ते पट्टणकोडोली या पंचगंगा नदीवरील भरावाचा परिणाम पुराला आमंत्रण देतो. पुलामुळे कोल्हापूर शहरासह पंचगंगा नदीच्या पश्चिमेकडील गावांना व शेतीला पुराचा धोका निर्माण होणार आहे. यामुळे शेती आणि साखर उद्योगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे कोल्हापुरातून होणारा शक्तीपीठ महामार्ग जिल्ह्याला खाईत लोटणार असल्याची कडक प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.
आज राजू शेट्टी यांनी माणगांव ते पट्टणकोडोली (ता. हातकंणगले) येथून जात असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या माणगांव गावातील बाधित शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, माणगांव ते पट्टणकोडोली या मार्गावरील पंचगंगा नदीवर दोन्ही बाजूला किमान चार ते पाच किलोमीटर भराव टाकावा लागणार आहे. या भरावामुळे पंचगंगा नदीच्या पश्चिमेकडील माणगांव, पट्टणकोडोली, रूकडी, हेर्ले, चोकाक, हालोंडी, शिरोली, कोल्हापूर शहर, गांधीनगर, वसगडे, चिंचवाड व वळीवडे या गावांना मोठा फटका बसणार आहे.
या सर्व गावांतील शेती संकटात येणार असून भरावामुळे पाणी निचरा होण्यास अडथळा निर्माण होणार आहे. परिणामी दीड ते दोन महिने पिके पाण्यात राहणार आहेत. त्यामुळे परिसरातील जमिनींचे क्षारपड होण्याचे प्रमाणही वाढणार आहे. शिवाय पुढील दहा वर्षांत पश्चिमेकडील हजारो एकर जमीन क्षारपड झाल्याने साखर उद्योगावर मोठे संकट येईल. भरावामुळे पाणी पातळी वाढल्यास कोल्हापूर शहर, शिरोली व गांधीनगर येथील उद्योग व्यवसायाला मोठा फटका बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुळात डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह हा वेगाचा असतो. यामुळे या पाण्यातून दगड व माती येण्याचे प्रमाण जास्त आहे. कोल्हापूर शहराच्या पुर्वेस नद्या संथ वाहतात. यामुळे सर्व गाळ व मातीचा भराव नदीमध्ये मोठ्या प्रमाणात साचणार आहे. या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार केल्यास शेतकरी, उद्योजक व व्यापारी तसेच शहरी नागरीकांना याचे दुरगामी परिणाम भोगावे लागणार आहेत.








