सांगली :
बाधित शेतकरी आणि संघटनांच्या विरोधामुळे थांबलेली नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाची मोजणी अखेर बुधवार 25 जूनपासून करण्यात येणार आहे. या महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने यापुर्वीच भुमी अभिलेख कार्यालयाकडे जमा केली आहे. आतापर्यंत संपूर्ण महामार्गाच्या 50 टक्के मोजणीचे कामही पूर्ण झाले आहे. सांगली वगळता अन्य जिल्हयातील मोजणी आणि भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत आल्याने जिल्हा प्रशासनानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मोजणी सुरू करण्यापूर्वी शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी आणि विरोधी संघटना यांची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. पवनार ते पत्रादेवी (नागपूर ते गोवा) शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन अन्य जिल्हयात अंतिम टप्यात आले आहे. जिल्ह्यातील भुसंपादनासाठी मिरज आणि विटा प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका बाजूला शेतकऱ्यांचा विरोध सुरू असतानाच शासनाने भुसंपादन आणि मोजणी प्रक्रिया गतीने सुरू केली आहे. रस्ते विकास महामंडळाने भुमी अभिलेख कार्यालयाकडे मोजणी शुल्क दोन महिन्यापूर्वी भरले आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन कामाला सुरवात करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तरीही विरोध सुरू असल्याने योजना दुतांमार्फत बाधित शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यातही शेतकरी, संघटना आणि अधिकाऱ्यांची वादावादी झाल्याने हालचाली थांबल्या होत्या. बुधवार 25 पासून मोजणीला सुरूवात करण्यात येणार आहे.
शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्हयातील कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज आणि आटपाडी या चार तालुक्यातील 19 गावांतून जाणार आहे. या चार तालुक्यातील 7611 शेतकऱ्यांचे सुमारे 616.67 हेक्टर क्षेत्र बाधीत होणार आहे. काही जिल्ह्यात यापूर्वीच मोजणी पूर्ण होऊन भुसंपादन सुरू झाले आहे. सांगली जिल्हयात अद्याप सुरूवात झाली नव्हती. राज्य रस्ते विकास महामंडळाने नियुक्त खासगी एजन्सीमार्फत महामार्गाची रूपरेषा निश्चित होताच मोजणीला सुरूवात करण्यात येणार आहे. या महामार्गामुळे बाधीत होणारी गावे पुढीलप्रमाणे, कवठेमहांकाळ : घाटनांद्रे तिसंगी, तासगाव : डोंगरसोनी, सावळज, सिध्देवाडी, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी, गव्हाण, सावर्डे, मतकुणकी, नागावकवठे, मिरज: कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी, आटपाडी : शेटफळे,
- तर बंदोबस्तात मोजणी : दिघे
शक्तीपीठ महामार्ग जमीन मोजणी आणि हद्दी निश्चितीचे काम सांगली वगळता अन्य जिल्ह्यात 50 टक्क्यापेक्षा जास्त झाले आहे. पुढील सिंधूदुर्ग जिल्हयातही हे काम पूर्ण झाले आहे. सांगली जिल्हयात बुधवार 25 पासून मोजणी सुरू करण्यात येणार आहे. त्यापुर्वी एक बैठक घेऊन शेतकरी आणि संघटनांचे गैरसमज दूर करण्यात येतील. अशी माहिती मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.








