लंडनमध्ये सेंट्रल बँकिंग पुरस्काराने गौरवित
► वृत्तसंस्था/ लंडन
भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना लंडन येथे ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ या सेंट्रल बँकिंग पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. बुधवारी हा पुरस्कार त्यांना लंडन येथे प्रदान करण्यात आला. कोरोना काळात त्यांनी घेतलेले प्रशंसनीय निर्णय आणि त्यांनी समर्थपणे केलेले महागाईचे नियंत्रण या कारणांसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे, अशी माहिती पुरस्काराच्या आयोजकांनी दिली.
कठीण परीक्षेच्या काळात शक्तिकांत दास यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या कार्यकाळात जागतिक संयुक्त पेमेंट इंटरफेस मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. भारताच्या चलन व्यवस्थेचे नेतृत्व त्यांनी अवघड काळात समर्थपणे केले. त्यांना हा पुरस्कार मिळणे भारताच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे, असे या जागतिक पुरस्काराच्या आयोजकांनी त्यांच्या निवेदनात स्पष्ट केले आहे. या पुरस्काराने सन्मानित केले गेलेले ते भारताचे दुसरे गव्हर्नर ठरले आहेत. 2015 मध्ये तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांना हा पुरस्कार मिळाला होता. शक्तिकांत दास हे 1980 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.









