वृत्तसंस्था/ ढाका
भारतात होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसठी तसेच श्रीलंकेत होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेकरता बांगलादेश क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अष्टपैलू शकीब अल हसनची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा क्रिकेट बांगलादेशने केली आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबरच्या अखेरीस न्यूझीलंड बरोबर होणाऱ्या वनडे मालिकेसाठी शकीबकडेच नेतृत्व ठेवण्यात आले आहे.
भारतात होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी त्याचप्रमाणे आशिया चषक स्पर्धेसाठी बांगलादेश संघाची घोषणा शनिवारी करण्यात येणार आहे. निवड समिती 17 जणांचा संघ निवडणार असल्याचे बांगलादेश क्रिकेट मंडळाचे नजमुल हुसेन यांनी सांगितले. पाठ दुखापतीमुळे तमिम इक्बाल आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत खेळू शकणार नसल्याने बांगलादेश क्रिकेट मंडळाने त्याच्या जागी शकीब अल हसनची नियुक्ती केली आहे. आता क्रिकेटच्या तिन्ही प्रकारासाठी बांगलादेशचे नेतृत्व शकीब अल हसनकडे सोपविले आहे. शकीबने 52 वनडे, 19 कसोटी आणि 39 टी-20 सामन्यात बांगलादेशचे नेतृत्व केले आहे.









