वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बांगलादेश संघाचा कर्णधार शकीब अल हसन याला दुखापत झाल्याने तो 11 नोव्हेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या सामन्यात खेळू शकणार नाही. सोमवारी कोटला मैदानावर लंकेविरूध्दच्या सामन्यात खेळताना शकीबच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती.
लंकेविरूध्दच्या सामन्यात खेळताना शकीब अल हसनच्या बोटाला ही दुखापत झाली होती. अशा स्थितीमध्ये त्याने फलंदाजी केली होती. सामना संपल्यानंतर त्याला तातडीने दवाखान्यामध्ये नेण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीमध्ये त्याच्या बोटाचे हाड मोडल्याने तो पुढील सामन्यात खेळू शकणार नाही असे सांगण्यात आले. शकीब अल हसन मायदेशी परतणार आहे. त्यामुळे तो या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात खेळू शकरणार नाही असे बांगलादेश संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. शकीब अल हसनच्या जागी आता बदली खेळाडू म्हणून अनामुल हक्क बिजॉय याचा संघात समावेश करण्यात आला आहे. लंकविरूध्दच्या सामन्यात शकीबने 65 चेंडूत 82 धावा जमवित आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला होता. या स्पर्धेतील बांगलादेशचा हा दुसरा विजय ठरला आहे.









