वृत्तसंस्था/ ढाका
फेब्रुवारी महिन्यात पाकमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी रविवारी बांगलादेश क्रिकेट मंडळाने संघाची घोषणा केली. या संघामध्ये माजी कर्णधार शकिब अल हसन आणि लिटन दास यांना वगळून अनपेक्षित धक्का दिला.
आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये शकिब अल हसनच्या गोलंदाजीवर निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत तो गोलंदाजी करु शकणार नसल्याने त्याला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. यष्टीरक्षक आणि फलंदाज लिटन दासलाही या स्पर्धेसाठी संघात स्थान मिळू शकले नाही. या स्पर्धेकरीता 15 जणांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला प्रारंभ होईल. 20 फेब्रुवारीला बांगलादेशचा सलामीचा सामना भारताबरोबर होत आहे.
लिटन दासला अलिकडच्या कालावधीत फलंदाजीत सातत्य राखता आले नाही. गेल्या 13 वनडे सामन्यात त्याला एकही अर्धशतक नोंदविता आले नाहीत. या कारणास्तव दासला संघात स्थान मिळू शकले नाही. अष्टपैलू अफिफ हुसेन, एस. इस्लाम आणि हसन मेहमूद यांनाही संघात स्थान मिळू शकले नाही. या स्पर्धेसाठी बांगलादेशचे नेतृत्व नजमूल हुसेन शांतोकडे सोपविण्यात आले आहे.
बांगलादेश संघ – नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहिम, टी. रिदॉय, सौम्या सरकार, टी. हसन, मेहमुदुल्ला, जाकेर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रेहमान, परबेज हुसेन, नसुम अहमद, तांजिम हसन व नाहिद राणा.









