वृत्तसंस्था / चेंगडू (चीन)
येथे झालेल्या 15 आणि 17 वर्षांखालील वयोगटातील मुले आणि मुलींच्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची शायना मणिमुत्तू तसेच दिक्षा सुधाकर यांनी अनुक्रमे 15 आणि 17 वर्षांखालील मुलींच्या कनिष्ठ गटातील जेतेपदासह सुवर्णपदक पटकाविले.
मुलींच्या 15 वर्षांखालील वयोगटातील झालेल्या अंतिम सामन्यात शायना मणिमुत्तूने जपानच्या चिहेरु टॉमिटाचा 21-14, 22-20 अशा गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदक मिळविले तर मुलींच्या 17 वर्षांखालील वयोगटातील अंतिम सामन्यात भारताच्या दिक्षा सुधाकरने कर्नाटकाच्या लक्ष्या राजेशचा 21-16, 21-9 अशा गेम्समध्ये फडशा पाडला. या स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करताना दोन सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली आहे.









