वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शनिवारपासून येथे सुरू झालेल्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरूषांच्या उंचउडी प्रकारात शैलेश कुमारने यजमान भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. या क्रीडा प्रकारात भारताच्या वरुण भाटीने नव्या स्पर्धा विक्रमासह कांस्यपदक घेतले. भारताची धावपटू दिप्ती जीवनजीने 400 मी. धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरी गाठली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नेदरलँड्सने दोन सुवर्णपदके मिळविली.
पुरूषांच्या टी-63 गटातील उंचउडी प्रकारात भारताचा शैलेश कुमारने नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक मिळविताना 1.91 मी.चे अंतर नोंदविले. या क्रीडा प्रकारात अमेरिकेचा विद्यमान ऑलिम्पिक विजेता इझेरा फ्रेचने 1.85 मी.चे अंतर नोंदवित रौप्य पदक तर भारताच्या वरुण भाटीने कांस्यपदक मिळविले.
महिलांच्या टी-71 गटातील 100 मी. धावण्याच्या शर्यतीत संयुक्त अमब अमिरातच्या तेक्रा अल्काबीने 19.89 सेकंदांचा अवधी घेत नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले.
महिलांच्या एफ-46 गटातील भालाफेक प्रकारात नेदरलँड्सच्या नोली रोर्दाने 43.74 मी. भालाफेक करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेतील तिचे हे पहिले सुवर्णपदक आहे. या स्पर्धेतील पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये नेदरलँड्सने दोन सुवर्णपदकांसह आघाडीचे स्थान मिळविले होते. त्याच प्रमाणे पोलंडने 1 सुवर्ण आणि 1 कांस्य, चीन, कोलंबिया, जपान आणि संयुक्त अरब अमिरात यांनी प्रत्येकी 1 सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या टी-37 गटातील लांबउडी प्रकारात चीनच्या वेन झीयाओनने सुवर्णपदक पटकाविताना 5.32 मी.ची नोंद केली. तर केनिया केरासेव्हाने जपानला पहिले सुवर्णपदक मिळवून देताना पुरूषांच्या टी-11 गटातील 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत 15 मिनिटे 23.38 सेकंदांचा अवधी घेतला. या क्रीडा प्रकारात ब्राझीलच्या जॅक्वेसने रौप्य पदक पटकाविले. महिलांच्या टी-20 गटातील 400 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताची धावपटू दिप्ती जीवनजीने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
पंतप्रधानांच्या स्पर्धकांना शुभेच्छा
शनिवारपासून येथे सुरू झालेल्या 2025 च्या विश्वपॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील सर्व खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू असून ती 5 ऑक्टोबरला संपणार आहे. सदर स्पर्धेत 104 देशांचे सुमारे 2200 स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पर्धेमध्ये एकूण 186 पदकांसाठी विविध क्रीडा प्रकारात खेळाडूंच्या लढती होतील.









