कोल्हापूर / कृष्णात चौगले :
कोल्हापुरात पाण्याचा सुकाळ आहे. 1972 च्या दुष्काळाचा अपवाद वगळता 53 वर्षात जिह्याला कधीही पाणी टंचाई जाणवली नाही. यंदा प्रमुख धरणांत सरासरी 60 टक्के पाणीसाठा असून जूनअखेर तो पुरेल, असे पाटबंधारे विभागाचे नियोजन आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे जिल्हा जलसंपन्न बनला आहे. राधानगरी धरणाबरोबरच जिह्यात पाटबंधारे विभागाचे मोठे, मध्यम आणि लघु असे 54 प्रकल्प कार्यान्वित आहेत. यातून जवळपास 110 टीएमसी पाणीसाठा आहे. या पाण्यामुळे 2 लाख 25 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली आहे. पाण्याचा सुयोग्य वापर झाल्यास जिह्यातील 5 लाख 22 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते, असा ‘पाटबंधारे’चा अंदाज आहे.
सिंचनासह पिण्यासाठी जूनअखरे पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे कोणत्याही भागामध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागत नाही. शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा तालुक्यातील दुर्गम भागातील वाड्यावस्त्यांमध्ये पाणीपुरवठा योजना झाल्या नसल्यामुळे मे महिन्यात काहीअंशी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा ठिकाणी प्रशासनाने विंधन विहिरींची तरतूद केली आहे.
- 3 लाख 11 हजार हेक्टर क्षेत्राची सिंचन क्षमता
पाटबंधारे विभागाचे जिह्यात 54 प्रकल्प असून जलसंधारण विभागाचे 392 पाझर तलाव आहेत. त्यामुळे त्यांची एकूण सिंचन क्षमता 3 लाख 11 हजार 86 हेक्टर आहे. जूनअखेर यातून 2 लाख 35 हजार 527 हेक्टर क्षेत्र निर्मितक्षमता पूर्ण होत आहे. 446 पाटबंधारे प्रकल्पांत पन्हाळा तालुक्यात 26, शाहूवाडी 84, गगनबावडा 12, करवीर 24, हातकणंगले 23, शिरोळे 4, राधानगरी 37, भुदरगड 36, कागल 43, आजरा 42, गडहिंग्लज 44 आणि चंदगड तालुक्यातील 71 प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळे पाणी टंचाईची फारशी झळ जाणवत नसली तरीही पाण्याचा काटसरीने वापर आवश्यक आहे.
- निवारणासाठी ‘जलजीवन’ प्रभावी
जिह्यातील सुमारे 200 गावे आणि वाड्यावस्त्यांमध्ये दरवर्षी पाणी टंचाई जाणवायची. पण 2023-24 अखेर जलजीवन मिशन, सौर ऊर्जा दुहेरी पाणी पुरवठा, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, तसेच अन्य योजनांतर्गत 150 टंचाईग्रस्त गावांपैकी 57 गावांमध्ये कायमस्वरूपी टंचाई निवारण झाले आहे. अद्याप एकही गावातून टंचाई उपाययोजनांबाबतचा प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. साधारणत: 20 लिटरपेक्षा कमी पाणी उपलब्ध होत असल्याचे आढळल्यास टंचाईबाबत उपाययोजना राबवल्या जातात. भूजल सर्व्हेक्षणच्या अहवालानुसार यावर्षी टंचाई अहवालानुसार कोणत्याही गावांना टंचाई भासण्याची शक्यता नाही. यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यात वळीव पाऊस झालाच नाही तर टंचाईची शक्यता आहे.
जिह्यातील बहुतांशी गावांमध्ये पाणी पुरवठ्याची सोय आहे. तरीही जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर पाणी दिले जाणार आहे. त्यानुसार जिह्यातील सुमारे बाराशेहून अधिक गावांमध्ये जलजीवन योजना राबवली जात आहे. पण पाणी योजना असून देखील भौगोलिक, भूजलशास्त्राrय प्रतिकूल परिस्थितीमुळे काही गावे, वाड्यावस्त्यांत टंचाई जाणवण्याची शक्यता असते.
- जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
टंचाई निर्माण होणार नाही, याची काळजी घेऊन टंचाईग्रस्त भागासाठी तात्काळ पाणीपुरवठ्याच्या योजना हाती घ्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे; त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून दरमहा आढावा घेऊन पाणी सोडण्याचे योग्य प्रकारे नियोजन केले जात आहे.
- मुबलक पाणी, तरीही पाण्याचा जपून वापर आवश्यक
कोल्हापूरमध्ये चांगले पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे 30 जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सिंचनाखालील क्षेत्रामध्ये वाढ होत असल्यामुळे उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनसारख्या सुक्ष्म सिंचन माध्यमांचा वापर करण्याची गरज आहे. पिण्याचे पाणी, औद्योगिक वसाहतींमधील पाण्याचा वापरही जपून करणे आवश्यक आहे.
– रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, कोल्हापूर
- प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टक्केवारी)
धरण यंदाचा साठा गतवर्षी याच दिवशीचा साठा
राधानगरी 62.48 51
तुळशी 70.60 62
वारणा 54.46 46
दुधगंगा 41.33 42
कासारी 61.66 61
कडवी 68.57 66
कुंभी 66.30 70
पाटगाव 60.33 62








