आणखी एक जखमी, कारची मोटारसायकलला धडक
बेळगाव : भरधाव कारने मोटारसायकलला ठोकरल्याने शाहूनगर येथील एका तरुणाचा मृत्यू झाला तर आणखी एक तरुण जखमी झाला. बुधवारी रात्री कॅम्प येथील शरकत पार्क परिसरात ही घटना घडली आहे. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. सज्जाद अब्दुलखादीर सुभेदार (वय 28) राहणार शाहूनगर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. साजिद शौकतअली मण्णीकेरी (वय 24) राहणार बसव कॉलनी हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. बुधवार दि. 27 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने मोटारसायकलला ठोकरल्याने सज्जाद व साजिद हे दोघे जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी इस्पितळात हलविण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता सज्जादचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पुढील तपास करीत आहेत.









