कर्जाला कंटाळून उचलले पाऊल
बेळगाव : शिवनेरी गल्ली, शाहूनगर येथील मेकॅनिक असलेल्या एका युवकाने मार्कंडेय नदीत उडी टाकून आपले जीवन संपविले आहे. गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला असून अलतगाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला आहे. दीपक मारुती भोवी (वय 42) असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. गुरुवारी अलतगाजवळ नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. उत्तरीय तपासणी करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार दीपक हा व्यवसायाने मेकॅनिक होता. नेहरुनगर येथे गॅरेज चालवत होता. घर बांधण्यासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करणे अवघड झाल्याने त्याने आपले जीवन संपविले आहे. 13 फेब्रुवारीपासून तो बेपत्ता होता. यासंबंधी त्याच्या पत्नीने एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. अखेर त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. व्यवसायाच्या माध्यमातून त्याने बऱ्याच जणांशी आपुलकीचे नाते जोडले होते.









