प्रतिनिधी,कोल्हापूर
नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 9 कोटींचा निधी मिळाला आहे. परंतू जागेच्या मालकीवरून निधी मनपाकडे देण्यासाठी खेळखंडोबा सुरू आहे. विशेष म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीमध्येच शाहू समाधी स्थळ दुर्लक्षित आहे. 6 मे रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता आहे. यापूर्वी तरी निधी मनपाकडे वर्ग होवून कामांना मुहूर्त मिळणार का असा सवाल शाहूप्रेमीतून उपस्थित होत आहे.
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार महापालिकेने नर्सरी बागेत समाधी स्मारकाचे काम सुऊ केले आहे. महापालिकेने 2 कोटी 80 लाखांच्या स्वनिधीतून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले. मनपाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली. 9 कोटी 40 लाख 56 हजार 109 ऊपये निधी निधी वर्गही झाले. चार महिने झाले आले तरी समाज कल्याणच्या खात्यावरच निधी पडून आहे. शासकीय आदेशानुसार स्मारकाची जागा महापालिकेने समाजकल्याण विभागाकडे हस्तांतर केल्यानंतरच हा निधी दिला जाईल, अशी भूमिका समाज कल्याण विभागाने घेतली आहे. मात्र, ही जागा छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टची असल्याने मनपा जागा हस्तांतर करू शकत नाही. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी हा विषय गंभिर्याने घेत अट शिथिल करण्यासाठी राज्य शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठविले. यालाही दोन महिने झाले तरी प्रधान सचिवांकडून या पत्राबाबत निर्णय झालेला नाही.
शाहूप्रेमीने पाठपुरवा करण्याची गरज
शाहू स्मृती शताब्दीच्या सांगता सामारंभासाठी कोल्हापुरातील शाहूप्रेमीकडून जय्यत तयारी केली जात आहे. चार दिवसांपूर्वी काहींनी यासंदर्भात बैठक घेतली. त्यांनी रॅली, व्याख्यानाचे आयोजन केले. दुसरा एक गटाने सवता सुभा करत आज सोमवारी बैठकीचे आयोजन केले आहे. ज्या प्रमाणे सांगता कार्यक्रमासाठी चढाओढ सुरू आहे. त्याचप्रमाणे शाहू समाधी स्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील अडकलेल्या 9 कोटींच्या निधीसाठी शासन स्तरावर पाठपुरवा करण्याची गरज आहे.
अभिवादनासाठी स्मारक, निधीसाठी दुर्लक्ष
कोणताही राजकीय नेते कोल्हापुरात आल्यानंतर अभिवादनासाठी नर्सरी बागेतील शाहू समाधी स्मारकाच्या ठिकाणी येतात. परंतू चार महिने झाले शासकीय पातळीवर निधीचे घोंगडे भिजत पडले आहे. सत्तेतील किंवा विरोधातील एकही नेता यासाठी प्रयत्न करत नाही, हे दुर्देवी आहे.
महत्वाची चौकट
पहिल्या टप्प्यातील कामासाठी खर्च-2 कोटी 80 लाख
दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी निधी -9 कोटी 40 लाख 56 हजार 109
दुसऱ्या टप्प्यातील निधी मंजूर -28 जुन 2022
समाज कल्याणकडे निधी वर्ग -13 डिसेंबर 2022
जिल्हाधिकाऱ्यांचे प्रधान सचिवांना पत्र-15 फेब्रुवारी 2023
Previous Articleजनावरांच्या सुक्या चाऱ्याचा प्रश्न बनला गंभीर
Next Article भर उन्हाळ्यात चिकनचा भडका









