कोल्हापूर :
कामगार कल्याण मंडळाने 70 वर्षापासून कला जपली आहे. त्यांच्यामुळेच महाराष्ट्राची जडण–घडण झाली. त्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक घेणार आहे. तसेच संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह जळल्यामुळे कलाकारांना कला सादर करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, येत्या काही महिन्यात शाहू स्मारकचा कायापालट करणार, असे आश्वासन आमदार अमल महाडिक यांनी दिले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 70 व्या कामगार नाट्या महोत्सव प्राथमिक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सिनेअभिनेते भरत दैनी होते. यावेळी अॅन एनिमी ऑफ द पीपल नाटकाचे सादरीकरण झाले.
आमदार महाडिक म्हणाले, चित्रनगरी माझ्या मतदारसंघात येते. त्यामुळे 50 कोटीचा नवीन प्रोजेक्ट मी तेथे आणणार आहे. कलानगरीचा विकास करून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेला कलेचा वारसा जपण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच कामगारांना सर्वोत्परी मदत करण्यासाठी मी सतत प्रयत्न करेन. जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, कामगारांसह कलाकारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. सिनेअभिनेते भरत दैनी म्हणाले, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहाचे काम शासनाने सुरू केले. परंतू आणखी दोन सभागृह कोल्हापुरात व्हावीत. तसेच शाहू स्मारक भवन येथील सभागृहात नाट्या सादरीकरणासाठी अनेक अडचणी येतात. त्यामुळे येथील त्रुटी दूर कराव्यात, अशी अपेक्षाही दैनी यांनी व्यक्त केली. पुणे विभागीय सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केले. कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी आभार मानले. यावेळी परीक्षक संजय मोहिते, प्रशांत जोशी, पवन खेबूडकर, सुरेश केसरकर आदी उपस्थित होते.
अॅन एनिमी ऑफ द पीपल
नॉर्वे या देशातील गावात डॉक्टर थॉमस स्टॉकमन व पीटर स्टॉकमन हे दोघे भाऊ राहतात. पीटर गावाचे नगराध्यक्ष असल्याने डॉक्टर स्टॉकमन यांच्या संकल्पनेतून गावात सार्वजनिक स्नानगृहे उभारली. औषधी पाण्यासाठी ही स्नानगृहे प्रसिद्ध असून व्यावसायिक पध्दतीने चालवतात. पीटर स्टॉकमन व गावातील काही श्रीमंत लोकांची यात आर्थिक गुंतवणूक आहे. डॉक्टर थॉमस स्टॉकमन या स्नानगृहांचे वैद्यकिय अधिकारी आहेत. पत्नी कॅथरिन, मुलगी पेट्रा व मॉर्टेन आणि एजलिफ असे त्यांचे कुटुंब आहे. मुलगी पेट्रा एका शाळेत शिक्षिका आहे. कालांतराने डॉक्टरांना स्नानगृहात उपचार घेणाऱ्या लोकांमध्ये विशिष्ट रोगांची लागण आढळते. त्यामुळे ते स्नानगृहातील पाणी परिक्षणासाठी पाठवतात व पाण्यात रोगजंतू आढळतात. सर्व पाईप्सची यंत्रणा दुरुस्त करण्याचा प्रस्ताव ते मांडतात. पण पीटर यांना डॉक्टरांचे म्हणने मान्य नसल्याने दोघांमध्ये संघर्ष निर्माण होतो. हॉवस्टॅड व बिलिंग हे दोघे ‘पीपल्स मेसेंजर’ दैनिक चालवतात. हॉवस्टॅड या दैनिकाचा संपादक आहे. स्नानगृहावरून हॉवस्टॅड व पीटर यांच्यात मतभेद होतात. हॉवस्टॅड दूषित पाण्यावरून पीटरवर सूड उगवू पाहतो. पण ‘पीपल्स मेसेंजर’ दैनिकाचा मालक अस्लाक्सन व्यावसायिक व स्थानिक नेता असल्याने पीटर विरुद्ध जात नाही. हॉवस्टॅड डॉक्टरांच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करतो पण ती त्याचा प्रस्ताव धुडकावून लावते. म्हणून हॉवस्टॅड, बिलिंग व अस्लाक्सन त्यांच्या विरोधात जातात. म्हणून डॉक्टर लोकांची एक सभा बोलवतात. पण पीटर, हॉवस्टॅड, बिलिंग व अस्लाक्सन ही सभा उधळवून लावतात. परिणामी गाव सोडण्यासाठी डॉक्टरांवर दबाव येऊ लागतो.








