प्रा.एस.पी.चौगले।वाकरे
Kolhapur News : श्रीपतराव चौगुले महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य, लेखक आणि संशोधक डॉ.जे.के.पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राधाकृष्णनगर येथे कै.सौ.हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शाहू महाराजांच्या जीवनावरील १९५ पुस्तकांचे “शाहू अध्यासन केंद्र” देश- विदेशातील शाहू संशोधकांना विनामूल्य खुले केले असून या स्तुत्य उपक्रमाबद्दल प्राचार्य डॉ.पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कौतुक होत आहे.
प्राचार्य डॉ. पवार हे शिक्षण क्षेत्रातील आणि संशोधनातील अभ्यासू व्यक्तिमत्व असून त्यांनी कोल्हापुरातील न्यू कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ काम केले. त्यानंतर त्यांनी श्रीपतराव चौगुले महाविद्यालय, कोतोली या ठिकाणी प्राचार्य म्हणून अत्यंत यशस्वीरित्या आपली कारकीर्द गाजवली. प्राचार्य पवार हे अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणून शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात परिचित आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाच्या अनेक क्रमिक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी “शाहू महाराजांची अर्थनीती” या विषयावर पुस्तक प्रकाशन केले.राजर्षी शाहू महाराज समजावून घेत असताना नकळतपणे त्यांच्यावर शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा बसला आणि आपण छत्रपती शाहू महाराजांच्या विषयी काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. केवळ ध्यास घेतला नाही, तर त्यासाठी अखंड चार वर्षे तपश्चर्या केली.
त्यांनी १८८५ ते २०२२ या कालखंडातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित असणाऱ्या पुस्तकांचा शोध घेतला.यामध्ये त्यांना या कालखंडात शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित १८० पुस्तकांची माहिती प्राप्त झाली. या सर्व पुस्तकांचा समावेश असलेले “राजर्षी शाहू महाराजांची वाङ्ममयीन स्मारके” हा संदर्भ ग्रंथ त्यांनी अलीकडेच प्रकाशित केला. त्यानंतर त्यांच्याकडे शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित असणारी अजून १५ पुस्तके प्राप्त झाली.
या सर्व पुस्तकांचा संदर्भ ग्रंथ तयार झाल्यानंतर आपण शाहू महाराजांच्या विषयी काहीतरी वेगळे करावे ही संकल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यातूनच त्यांनी शाहू जयंतीच्या पूर्वसंध्येला शाहू महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.आज या शाहू अध्यासन केंद्रात १३७ वर्षात विविध लेखकांनी लिहिलेली १९५ पुस्तके आहेत. ही सर्व पुस्तके शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर संशोधन करणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना संदर्भ म्हणून विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प प्राचार्य पवार यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर या अध्यासन केंद्रात असणाऱ्या शाहू महाराजांच्या कार्यावरील काही उतारे ज्या संशोधकांना हवे असतील त्यांना झेरॉक्स प्रति विनामूल्य देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.अशाप्रकारे राजर्षी शाहू महाराजांच्या विषयी एक वेगळी कृतज्ञता प्राचार्य पवार व त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. या अध्यासन केंद्राचे नुकतेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आता हे शाहू अध्यासन केंद्र सर्व शाहू संशोधकांना, अभ्यासकांना मोफत उपलब्ध होणार आहे.या सर्व कार्यात त्यांना चिरंजीव प्रा.दिग्विजय पवार यांचे सहकार्य लाभले.









