शेतकरी, कष्टकरी, महिला, युवा, उद्योजक या सर्वांच्या समस्या संसदेत प्रभावीपणे मांडतानाच कोल्हापूरचा सर्वांगिण विकास हाच ध्यास घेत मैदानात उतरलेल्या शाहू महाराज यांना प्रचंड बहुमताने विजयी करत ताकद द्यावी असे आवाहन माजी आमदार मालोजीराजे यांनी केले. सावडे बुद्रुक (ता. कागल) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मालोजीराजे बोलत होते. अध्यक्षस्थानी महादेव अस्वले हे होते.
मालोजीराजे छत्रपती पुढे म्हणाले, जनतेने आपल्या समस्या सोडवण्यासाठी ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले, त्या लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षात संसदेत कधीही तोंड उघडले नाही. कोल्हापूर जिह्यात एकही मोठा प्रकल्प त्यांना आणता आला नाही. जनतेने शेअर्सच्या स्वरूपात उभा करून दिलेला दूध संघ त्यांनी विकला. शेतकर्यांच्या कारखान्यावरही कर्जाचा बोजा वाढवून ठेवला. कारखान्याच्या कर्मचार्यांचे थकलेले पगार भागवण्यासाठीही त्यांच्यावर कर्ज काढण्याचे वेळ आली. याच कारखान्याची शेवटची संचालक मंडळाची बैठक कधी झाली, हे आठवतही नाही. नुकत्याच झालेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत ज्यांच्यावर जहरी भाषेत टीका केली, त्यांच्याच हातात हात घालून आज ते मतांसाठी फिरत आहेत. अशा निक्रिय खासदारांची निक्रिय कारकीर्द कायमस्वरूपी थांबवण्याची हीच वेळ आहे.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, भाजपचे सरकार हे केवळ उद्योगपतींसाठीच काम करताना दिसत आहे, याचे उदाहरण म्हणजे 370 कलम हटवून साडेतीन हजार एकर जमीन अदानींना देण्यात आली. या जमिनीत लिथेनियम मोठ्या प्रमाणात आढळते. हे लिथेनियम इलेक्ट्रिक बॅटरी निर्मितीत उपयोगी पडते. जुन्या संसदेत कामकाज करणारा तिसर्यांदा पंतप्रधान होत नाही, असे भाकीत कुणीतरी सांगितले म्हणून गोमुख संसद 20 हजार कोटी खर्चून बांधण्यात आली. असे अंधश्रद्धा जपणारे आणि समाजात जातीय तेढ निर्माण करणारे हे भाजप सरकार आणि त्यांची संस्कृती आत्ताच संपवण्याची गरज आहे.
अंबरीशसिंह घाटगे म्हणाले, मुरगूडमधील कुणीतरी अज्ञानपणानं, गृहपाठ न करताच शाहू महाराजांनी काय केले असा प्रश्न विचारत आहेत. परंतु त्या आधी विद्यमान खासदारांनी पाच वर्षात काय केले? हे सांगाव. याउलट कोणतीही सत्ता हाती नसताना शाहू महाराजांनी राधानगरीत वसतीगृह उभारले, परिते येथे 27 एकर स्वत:ची जमीन मोफत शेतकर्यांना बहाल केली. चिखली येथे चौदाशे प्लॉट मोफत दिले. कागलमध्येही 1640 कुटुंब आज शाहू महाराजांनी दिलेल्या जमिनीवरच जीवन जगत आहेत. केवळ नावाने नाही तर कृतीनं शाहू छत्रपतींनी राजर्षीचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवले आहे. जरांगे पाटील यांचे आंदोलन, ऊस उत्पादक शेतकर्यांचे आंदोलन, कोल्हापूरचे टोलविरोधातील आंदोलन अशा जनहिताच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. आता शेतकर्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग घालवायचा असेल तर शाहू छत्रपतींशिवाय पर्याय नाही. सत्ता असुनही काहीच काम करता आले नसल्याने खोके घेणारे आणि खोके देणारे आज गल्लीबोळातून मतांची भीक मागत फिरत आहेत.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज कांबळे, कॉ. शिवाजी मगदूम, विकास पाटील, शिवानंद माळी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नाना कांबळे, उमाजी पाटील, सागर कोंडेकर, हळदीचे व्हरंबळे, मधुकर भोसले आदी प्रमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष पाटील तर आभार एस. टी. चव्हाण यांनी मानले.