कोल्हापूर प्रतिनिधी
करवीर संस्थानचे अधिपती श्रीमंत शाहू छत्रपती यांचा 75 वा अमृतमहोत्सवी वाढदिवस 7 जानेवारीला साजरा झाला. या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने श्रीमंत शाहू छत्रपतींना त्यांच्या सामाजिक, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
मनसेचे संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे यांच्या हस्ते श्रीमंत शाहू छत्रपती यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना जयराज लांडगे यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याकडून तमाम जनतेला मार्गदर्शन लाभो, त्यांच्या हातून समाजसेवेचे कार्य पुढे असेच चालत राहो, त्यांना आई अंबाबाई उदंड आयुष्य देवो, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. यावेळी युवराज मालोजीराजे छत्रपती, मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करजगार, शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजू दिंर्डोले, पुंडलिक जाधव, प्रसाद पाटील, अभिजित राऊत, अमित पाटील, संजय करजगार, अभिजित पाटील, प्रताप पाटील, रवि गोंदकर, अजिंक्य शिंदे, यतीन होरणे, रणजित वरेकर, रत्नदीप चोपडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
राज ठाकरे यांचा शुभेच्छा संदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करणारा संदेश पत्ररूपाने पाठविला. मनसेच्या पदाधिकाऱयांना श्रीमंत शाहू छत्रपती यांना संदेशपत्र दिले.








