‘भाजपाला आता कोणत्याही कुबडीची गरज नाही,’ हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात स्फोटक ठरले. या एका विधानाने राज्यातील सत्ता समीकरणे पुन्हा ढवळून निघाली. शाह यांचे हे वक्तव्य जरी निवडणूक संघटनात्मक तयारीच्या संदर्भात केलेले असले, तरी त्याचे परिणाम सत्ताधारी महायुतीच्या घराघरात जाणवू लागले आहेत. त्यामुळे या अस्थिरतेचा येत्या निवडणुकीत प्रभाव पडण्याची चिन्हे आहेत. भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या युतीचे भवितव्य काय, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
शिंदे गटात अस्वस्थता, पवार गटात गोंधळ
अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात स्पष्ट अस्वस्थता दिसून आली. शिंदे समर्थक खासदार आणि आमदारांनी हे वक्तव्य अचानक आलेले धक्कादायक विधान म्हणून पाहिले. कारण गेल्या दोन वर्षांत भाजपच्या पाठिंब्यावरच शिंदे सेनेने सत्ता राखली आहे. “आमच्याशिवाय भाजप महाराष्ट्रात सत्तेत राहू शकत नाही” अशी धारणा त्यांनी तयार केली होती. त्याला केंद्रात आपला टेकू महत्त्वाचा आहे हे कारण होते. पण, शाह यांच्या शब्दांनी ती धारणा डळमळली. दुसरीकडे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतही गोंधळ आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यांचे काही नेते स्पष्ट सांगतात की “शाह यांचे वक्तव्य म्हणजे अप्रत्यक्ष इशारा आहे. निवडणुकीनंतर भाजप स्वतंत्रपणे बहुमत मिळवू शकतो आणि नंतर आपले निर्णय स्वत: घेईल.” या शक्यतेमुळे राष्ट्रवादीतील काही वरिष्ठ नेते पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात येऊ शकतात.
भाजपचे धोरण : ‘एकटे पण मजबूत’
भाजपकडील वर्ग या विधानामागे एक मोठा राजकीय संदेश असल्याचे समजतो. 2014 ते 2019 दरम्यान भाजपने शिवसेनेला झेलत सत्तेत सहभाग राखला, पण त्यातून मिळालेला अनुभव चांगला नव्हता. पुढे 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मिळालेली सत्ता ही अल्पकालीन सोय होती. पण आता भाजपचे ध्येय ‘पूर्ण बहुमताने सत्ता’ हेच आहे आणि आता कुणाची भीड ठेवायची गरज नाही अशी आक्रमक भाषा भाजपमध्ये सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था वाटाघाटीत जिह्याजिह्यात त्याचे पडसाद उमटत आहेत.
या पार्श्वभूमीवर शाह यांचे वाक्य म्हणजे पक्षकार्यकर्त्यांना दिलेला “स्वावलंबनाचा मंत्र” असेही म्हणता येईल. भाजप आता महाराष्ट्रात विधानसभेला ‘मोदी-शहा फॅक्टर’ आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर सर्व 288 जागा लढण्याच्या तयारीत असल्याची ही चिन्हे आहेत. किमान आज डोईजड होऊ लागलेल्या मित्रपक्षांना त्यामुळे दणका देण्यास त्यांनी सुरुवात तरी यानिमित्ताने केलेलीच आहे. जी पुढे जाऊन ही शब्द खरे ठरवणारी ठरू शकते.
विरोधकांकडून खिल्ली आणि संधी
या वक्तव्यानंतर विरोधकांनी शिंदे आणि अजित पवार यांची जोरदार खिल्ली उडवली. उद्धव ठाकरे यांनी व्यंगात्मक भाषेत प्रतिक्रिया देताना म्हटले, “कुबडीचं काम संपलं की ती फेकली जाते, हे शहाण्यांना आधीच माहिती असतं.” तर शरद पवारांनीही सूचक भाष्य करत म्हटले की “राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, फक्त हितसंबंध असतात.” कॉंग्रेसकडूनही या विषयावर जोरदार हल्लाबोल झाला. “भाजपने आपले सहयोगी वापरून घेतले आणि आता त्यांना टाकून देण्याची तयारी सुरू केली,” अशी टीका नाना पटोले यांनी केली.
मंत्रिमंडळ आणि उमेदवारीवर परिणाम
नजिकच्या काळात राज्य मंत्रिमंडळात बदल होऊ शकतात. तेव्हा मित्रपक्षांवर देखील निक्रियतेचा ठपका ठेऊन डोकेदुखी ठरणाऱ्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी भाजप दबाव वाढवू शकतो ज्याला विरोध करणे या पक्षांना कठीण होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठ्या महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरही नव्याने पुनर्विचार सुरू झाला आहे. त्यातून पुढे भाजप प्रत्येक मतदारसंघात भाजपचा स्वतंत्र कार्यकर्ता आणि संघटन रचना भक्कम करेल. हा प्रयत्न दोन्ही मित्रपक्षांच्या उरात धडकी भरवणारा ठरू शकतो. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीच्या तिकिटांवरून दोन्ही सहयोगीमध्ये नाराजी वाढू शकते. शिंदे गटातील काही आमदारांना भीती वाटते की भाजप त्यांच्या मतदारसंघातही स्वत:चा उमेदवार उभा करेल.
भाजपला जाणणाऱ्या राजकीय तज्ञांच्या मते, अमित शाह यांचे वक्तव्य हे केवळ प्रचारातील उद्गार नसून एक दीर्घकालीन राजकीय दिशानिर्देश आहे. भाजप महाराष्ट्रात पुन्हा एकदा “एकटे लढा, एकटे जिंका” या सूत्राकडे वळत आहे. त्यातून शिंदे आणि अजित पवार यांची भूमिका ‘तात्पुरत्या सहयोगींची’ ठरू शकते. अर्थात केंद्रातल्या सरकारसाठी त्यांना पुरेसे खासदार हवेत म्हणून मित्रपक्ष सांभाळले गेले तरी एक गोष्ट नक्की शाह यांच्या त्या एका वाक्याने महाराष्ट्रातली सत्तारचना पुन्हा एकदा अस्थिर झाली आहे, आणि पुढील काही महिने हेच राजकीय वर्तुळातील मुख्य चर्चेचे केंद्र ठरणार आहेत. परिणामी विरोधकांना देखील महायुतीच्या तंबूत खळबळ माजवण्यास बळ मिळालेआहे.
शिवराज काटकर








