वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाकुंभमेळ्यात सहभागी होऊन प्रयागराज येथे संगमात ‘डुबकी’ घेतल्याच्या घटनेलाही त्वरित राजकीय वळण मिळाले आहे. अशी डुबकी घेतल्याने गरीबी दूर होत नाही, अशी टिप्पणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली असून भारतीय जनता पक्षाने पलटवार केला आहे.
खर्गे यांनी शहा यांच्या या डुबकीसंदर्भात आणखीही टोमणे मारले आहेत. शहा यांनी 100 जन्म घेतले तरी ते स्वर्गात जाऊ शकणार नाहीत, असेही व्यक्तव्य खर्गे यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाने या वक्तव्यांचा समाचार घेतला असून काँग्रेसची हिंदूद्वेषी मनोवृत्ती या विधानांवरुन स्पष्ट होते, अशी टीका केली आहे.
नेत्यांमध्ये स्पर्धा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी इतकी पापे केली आहेत, की, त्यांना 100 जन्म मिळाले तरी ते स्वर्गारोहण करु शकणार नाहीत. कोणतीही डुबकी त्यांना त्यांच्या कृत्यांपासून मुक्ती देऊ शकणार नाही, असे प्रतिपादन खर्गे यांनी मध्यप्रदेशातील मऊ येथील जाहीर सोमवारी पेले. अशी डुबकी घेण्याने गरीबी दूर होणार आहे काय, तसेच तुम्हाला अन्न मिळणार आहे काय, असेही प्रश्न खर्गे यांनी या सभेला उपस्थित असणाऱ्यांना उद्देशून केले.
वक्तव्यानंतर आले भानावर
कुंभमेळा आणि गंगास्नान या विषयांवर अशी विधाने केल्यानंतर खर्गे यांना या विधानांच्या संभाव्य परिणामांची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी त्वरित क्षमायाचनाही केली. माझ्या उद्गारामुळे या सभेतील कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची क्षमा मागतो. माझा उद्देश कोणाच्या भावना दुखाविण्याचा नव्हता, असेही विधान त्यांनी केले. यावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
अवमानजनक विधान
मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेली विधाने धार्मिक भावनांना ठेच लावणारी आहेत. काँग्रेस हिंदू समाज आणि सनातन धर्म यांची चेष्टा करीत आहे. खर्गे यांनी केलेल्या विधानांसाठी केवळ त्यांनी हिंदू समाजाची क्षमायाचना करुन चालणार नाही, तर संपूर्ण काँग्रेस पक्षाने क्षमा मागावयास हवी, अशी मागणी त्यांनी केली.









