वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी पाक क्रिकेट मंडळाने शनिवारी कसोटी संघाची घोषणा केली. या संघात पाकचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचे पुनरागमन झाले आहे. त्याचप्रमाणे मोहमद हुरारा आणि अमिर जलाल या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
पाकिस्तान आणि लंका यांच्यात होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 16 जणांच्या पाक संघाचे नेतृत्व बाबर आझमकडे सोपवण्यात आले आहे. ही मालिका लंकेत होणार आहे. या मालिकेने आयसीसीच्या तिसऱ्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या मालिकेसाठी पीसीबीने दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्कलची गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मॉर्कल आणि पीसीबी यांच्यात सहा महिन्यांसाठी हा करार झाला आहे.
गेल्या वर्षीच्या जुलैपासून पाकचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला दुखापतीमुळे क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागले होते. गुडघ्याला झालेली दुखापत लवकर बरी होऊ शकली नाही. गेल्या जुलै महिन्यात शाहीन आफ्रिदीने आपली शेवटची कसोटी लंकेत खेळली होती. त्याचप्रमाणे गेल्या ऑक्टोबर महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात शाहीन आफ्रिदी आपला शेवटचा सामना खेळला होता. या मालिकेसाठी पाकचा नवोदित गोलंदाज 21 वर्षीय मोहमद हुरेरा याला कसोटी पदार्पण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पाकमध्ये झालेल्या कैद ए आझम चषक क्रिकेट स्पर्धेत मोहमद हुरेराने 31 गडी बाद केल्यामुळे पाकच्या निवड समितीने त्याची या मालिकेसाठी निवड केली आहे. त्याचप्रमाणे अमिर जमाल या नवोदितालाही पाकने कसोटी पदार्पणाची संधी दिली आहे. लंकेबरोबर होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या पाक संघामध्ये सहा फलंदाज, चार वेगवान गोलंदाज, चार फिरकी गोलंदाज, आणि दोन यष्टीरक्षक आणि फलंदाज यांचा समावेश आहे.
पाक कसोटी संघ- बाबर आझम (कर्णधार), मोहमद रिझवान, अमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अब्रार अहमद, हसन अली, इमाम उल हक, मोहमद हुरेरा, मोहमद नवाज, नसीम शहा, नौमन अली, सलमान आगा, सर्फराज अहमद, सौद शकील, शाहीन आफ्रिदी आणि शान मसूद.









