बेळगाव : अळवण गल्ली, शहापूर येथील मंगाई देवीची यात्रा शुक्रवारी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी शहापूर, बेळगाव तसेच वडगाव येथील शेकडो भाविक दाखल झाले होते. ओटी भरण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी 10 वाजता पारंपरिक पद्धतीने पंचकमिटीतर्फे गाऱ्हाणे उतरविण्यात आले. त्यानंतर महाआरती, पूजन व ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. देवीला नैवेद्य दाखविण्यात आला. सायंकाळी 7 वाजता आरती केली. यावेळी ट्रस्टचे सरपंच गोविंदराव काकतकर, सचिव संजीव कागळे, उपसचिव अनिल कुरणकर, खजिनदार रविकांत हैबत्ती, संजय मुतगेकर, दीपक अडकूरकर, सूरज कुडूचकर, सुभाष गोरे, परशुराम कदम, देवेंद्र पाटील, आप्पाजी जांगळे, सुभाष हैबत्ती, केदारी कुंभार, नागेंद्र हैबत्ती, सतीश देसाई, लक्ष्मण निकम, रमाकांत चव्हाण, पुंडलिक हंगिरगेकरसह इतर उपस्थित होते.
सराफ गल्ली मरगाईदेवी मुखवट्याची मिरवणूक-प्रतिष्ठापना
सराफ गल्ली, शहापूर येथील मराठा पंचकमिटीतर्फे श्री मरगाईदेवी मुखवट्याची मिरवणूक तसेच मूर्तीची प्रतिष्ठापना व अभिषेक कार्यक्रम शुक्रवारी भक्तिभावाने पार पडला. गुरुवारी सायंकाळी मरगाईदेवी मुखवट्याची सवाद्या मिरवणूक काढली. मिरवणुकीमध्ये मराठा पंचकमिटीचे सदस्य आणि शिवप्रेमी युवक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सराफ गल्ली व शहापूर भागातील भाविक बहुसंख्येने सहभागी झाले होते. डोक्यावर मंगलकलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झालेल्या सुवासिनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. मिरवणुकीनंतर गल्लीतील वार्ताफलकाचे अनावरण मराठा पंचकमिटीचे अध्यक्ष रमेश बाबुराव चौगुले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शिवप्रेमी युवक मंडळ, पंचकमिटीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.
मूर्तीची प्रतिष्ठापना
देवीच्या मुखवट्याची शुक्रवारी सकाळी मरगाईदेवी मंदिरात विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. सर्व विधी सौ. व श्री. विक्रांत विलास लाड आणि सौ. व श्री. महादेव कृष्णा लाड यांच्या हस्ते केल्या.









