आयसीसीने वर्ल्डकपसाठी जाहीर केला धमाकेदार प्रोमो : सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल : चाहत्यांचीही पसंती
वृत्तसंस्था /मुंबई
यंदाची आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. तर याच मैदानावर 15 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला रंगणार आहे. अशातच आयसीसीने अधिकृत ट्विटर हँडलवर वर्ल्डकप 2023 चा प्रोमो व्हिडिओ लाँच केला आहे. या 2 मिनिटे 13 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये, आयसीसीने विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांची झलक दाखवली आहे. या सोबतच चाहत्यांच्या वेगवेगळ्या भावनाही दाखवण्यात आल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी तीन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. यासाठी आयसीसीने जोरदार तयारी सुरू केली आहे. आयसीसीकडून या स्पर्धेचे प्रमोशनही जोरदार केले जात आहे. या एपिसोडमध्ये नुकताच एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ज्यामध्ये बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान चमकणाऱ्या ट्रॉफीसोबत दिसत आहे. बॉलीवूडच्या किंगने यात आवाज दिला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला जगभरातील विविध क्रिकेट चाहत्यांना दाखवण्यात आले आहे. यानंतर मागून शाहरुख खानचा आवाज येतो, जो वनडेचे महत्त्व सांगतो. इतिहास घडवण्यासाठी, शौर्य दाखवण्यासाठी, काहीतरी मोठे करण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रोमोसाठी शाहरुखचा आवाज वापरला असून व्हिडिओच्या शेवटी किंग खान वनडे विश्वषकाच्या ट्रॉफीसोबत दिसत आहे. दरम्यान, चाहत्यांकडून हा व्हिडिओ खूपच कमी काळात तुफान व्हायरल केला गेला आहे.
नऊ खास क्षणांचा समावेश
या व्हिडिओमध्ये काही भावनिक क्षणही जोडण्यात आले आहेत. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची हतबलता ते 2011 वर्ल्डकप फायनलमधील धोनीचा षटकार, हे प्रसंग या व्हिडीओत दाखवण्यात आले आहेत. याशिवाय, क्रिकेटमधील ऐतिहासिक क्षणांमध्ये वेस्ट इंडिजने जिंकलेला पहिला एकदिवसीय विश्वचषक, कपिल देव यांनी लॉर्ड्सच्या मैदानावर घेतलेले वर्ल्डकप ट्रॉफीचे चुंबन, असे अनेक सुंदर क्षण जोडले गेले आहेत. व्हिडिओमध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान तसेच क्रिकेटपटू जेपी ड्युमिनी, दिनेश कार्तिक, इऑन मॉर्गन, मुथय्या मुरलीधरन, जॉन्टी ऱ्होड्स आणि जेमिमा रॉड्रिग्ज देखील आहेत. या व्हिडिओमध्ये ‘मॅच कट्स‘च्या जादूद्वारे नऊ भावनांचे चित्रण करण्यात आले आहे. यामध्ये आनंद, सामर्थ्य, गर्व, सन्मान, वेदना, अभिमान, शौर्य, आश्चर्य आणि प्रचंड इच्छाशक्ती यांसारख्या क्षणांचा समावेश आहे. क्रिकेट चाहत्यांना सामना पाहताना या 9 भावनांचाच सर्वाधिक अनुभव येतो. दरम्यान, विश्वचषकासाठी मोहिमेचा व्हिडिओ मुंबईतील एका कार्यक्रमात भारतातील 85 कंटेंट क्रिएटर्सच्या उपस्थितीत लाँच करण्यात आला. या कॅम्पेनचा व्हिडिओ डिस्ने स्टारच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.









