वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आपले शारिरीक वजन बरेचसे कमी करण्यात यश मिळविले आहे. इन्सिट्यूट ऑफ लीव्हर आणि बिलीरी सायन्सेस (आयएलबीएस) या संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुरेशी झोप, आहारावर नियंत्रण, भरपूर जलपान, नियमित व्यायाम आणि पथ्य ही पंचसूत्री त्यांनी उपस्थितांसमोर स्पष्ट केली. त्यांनी तरुणांनाही यासंबंधी मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय यकृत दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. प्रत्येक दिवशी दोन तास व्यायाम आणि किमान सहा तासांची निद्रा हे आरोग्याचे सूत्र तरुणांना आचरणात आणावे, अशी सूचना त्यांनी केली. मी माझ्या जीवनशैलीत परिवर्तन केले आणि त्यानंतर त्वरित मला सुपरिणाम अनुभवावयास मिळाला, अशी स्वत:संबंधी माहितीही त्यांनी दिली.
मे 2019 पासून
मे 2019 पासून मी निश्चयपूर्वक माझ्या जीवनशैलीत परिवर्तन केले. माझ्या आहार मर्यादित केला. व्यायाम वाढविला, तसेच जीवनात नियमितपणा आणला. त्यानंतर पाच वर्षांमध्ये माझ्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली. आता वजन संतुलित आहे आणि उत्साहात वाढ झाली आहे, असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
निर्णयक्षमतेत वाढ
जीवनात नियमितता आणल्याने आणि आहार, व्यायाम, झोप आणि जलपान यांच्या संतुलनाने माझे शरीर सुदृढ झाले आहे. माझ्या निर्णयक्षमतेत आणि काम करण्याच्या उत्साहात मोठी वाढ झाल्याचा अनुभव मला येत आहे. केवळ साडेचार वर्षांमध्येच मी आता सर्व अॅलोपॅथिक औषधांपासून मुक्त झालो आहे. मला प्रकृतीअस्वास्थ्यापासून स्वातंत्र्य मिळाले आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.









