वृत्तसंस्था / गुवाहाटी
23 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत येथे खेळविण्यात आलेल्या कर्नाटक संघाविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हरियाणाकडून खेळणाऱ्या शेफाली वर्माने शानदार हॅट्ट्रीक नोंदविली.
नुकत्याच झालेल्या महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेतील पहिल्या चार सामन्यात शेफाली वर्माकडून फलंदाजीत फारशी चांगली कामगिरी होऊ शकली नाही. पण त्यानंतर उर्वरित सामन्यात तिने 304 धावा जमविल्या. कर्नाटकाविरुद्धच्या सामन्यात हरियाणाचे नेतृत्व शेफालीकडे सोपविण्यात आले होते. या सामन्यात कर्नाटकाने 50 षटकात 217 धावा जमविल्या. शेफाली वर्माने कर्नाटकाच्या डावातील 44 व्या षटकात ही हॅट्ट्रीक साधली. तिने या षटकातील पाचव्या चेंडूवर सलोनीला, सहाव्या चेंडूवर सौम्या वर्माला तर आपल्या पुढील षटकातील पहिल्या चेंडूवर डिसोजाला बाद केले. तिने चार षटकात 20 धावांत 3 गडी बाद केले. कर्नाटकातर्फे मिथीला विनोदने 87 चेंडूत 90 धावा झळकविला. हरायणाच्या डावामध्ये शेफालीने चार चौकारांसह 18 धावा जमविल्या. त्यानंतर हरियाणा संघातील सोनियाने 79 चेंडूत 66 तर तनिषाने 77 चेंडूत नाबाद 77 धावा आणि त्रिवेणीने नाबाद 25 धावा झळकविल्याने हरियाणाने हा सामना 6 गड्यांनी जिंकला.









