गुगल आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ दु:खी : सुंदर पिचाई म्हणाले कर्मचाऱ्यांची सुरक्षा हीच प्राथमिकता
वृत्तसंस्था /कॅलिर्फोर्निया
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी इस्रायलवरील दहशतवादी हल्ला आणि हमाससोबतच्या वाढत्या संघर्षाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पिचाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर लिहिले, ‘आम्ही इस्रायलमधील आमच्या सर्व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला आहे आणि त्यांना पाठिंबा देत राहू. गुगलची तेथे दोन कार्यालये आहेत आणि 2 हजारांहून अधिक कर्मचारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी सत्या नडेला यांनी लिहिले की, ‘इस्रायलमधील दहशतवादी हल्ले आणि जे अत्याचार दिसत आहेत, त्यामुळे मला खूप दु:ख झाले आहे.’ ग्राउंड लेव्हलवर साथ देईल असेही ते म्हणाले आहेत. ‘आम्ही आमच्या उत्पादनाद्वारे लोकांना विश्वासार्ह, अचूक माहिती देण्यासाठी तज्ञांच्या टीमसोबत काम करत आहोत. आमचे विचार पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे सुंदर पिचाई म्हणाले.
हैफा, तेल अवीवमध्ये गुगलची कार्यालये
इस्रायलमध्ये हैफा आणि तेल अवीवमध्ये गुगलची दोन कार्यालये आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे कंपनी चिप डिझायनिंग आणि मशीन लर्निंग तसेच भाषा समजण्यासह इतर अनेक गोष्टींवर संशोधन करते. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनीही घटनेबाबत शोक व्यक्त केला. सीईओ सत्या नडेला यांनी लिहिले की, ‘मृत्यू आणि प्रभावित झालेल्यांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आहेत. आमचे लक्ष आमचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेवर आहे. आम्ही एकत्रितपणे या द्वेषाचा आणि क्रूरतेचा निषेध करतो. इस्रायलमधील आमचे सुमारे 3,000 कर्मचारी थेट प्रभावित झाले आहेत. आमच्याकडे जगभरातील ज्यू कर्मचारी आहेत जे यामुळे दु:ख, भीती आणि चिंतेमध्ये आहेत. आमच्याकडे जगभरात पॅलेस्टिनी कामगार आहेत जे त्यांच्या प्रियजनांच्या सुरक्षिततेबद्दल आणि दहशतवादाच्या विरोधात चिंतीत आहेत.
नेतन्याहू यांनी मोदींना केला फोन
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 10 ऑक्टोबरच्या संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. त्यांनी मोदींना युद्धाची संपूर्ण माहिती दिली. यानंतर मोदींनी ट्विट केले असून त्यात ‘या कठीण काळात भारतातील जनता इस्रायलसोबत आहे. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात आहोत’ असे म्हटले आहे.
टीसीएसचे 250 कर्मचारी इस्रायलमध्ये सुरक्षित
भारतातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सुमारे 250 कर्मचारी इस्रायलमध्ये आहेत. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर आणि व्यवसायाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन गणपति सुब्रमण्यम यांनी 11 ऑक्टोबर रोजी ही माहिती दिली.









