पिके धोक्यात, पिण्याच्या पाण्याची समस्याही बनली गंभीर
प्रतिनिधी / बेळगाव
पावसाने अद्यापही जोर धरला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. येत्या एक-दोन दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. सर्वच पिके धोक्यात आली असून अजून काही ठिकाणी खरिपाची पेरणीदेखील झाली नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून जनतेला टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. राकसकोप जलाशयानेही तळ गाठला आहे. हिडकल जलाशयातील पाणी कमी झाले आहे. जर पाऊस जोरदार झाला नाही तर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या भात, सोयाबिन, भुईमूग या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. मात्र पावसाने अद्याप तरी म्हणावी तशी साथ दिली नाही.
गेल्या आठ दिवसांपासून मान्सूनचे आगमन झाले असले तरी पावसाला जोर नाही. केवळ शिडकावा होत आहे. त्यामुळे हा पाऊस कुचकामी ठरू लागला आहे. नदी, नाले, विहिरी, तलावांनी तळ गाठला आहे. शिवारामध्ये जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे भातपीक पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या बळीराजा तणावाखाली वावरत आहे. दरवर्षी आषाढीला दमदार पाऊस कोसळतो. मात्र यावर्षी आषाढीही कोरडी गेली आहे. त्यामुळे साऱ्यांसमोरच मोठे संकट उभे राहिले आहे. ऊसपीक पाण्याविना वाळून जाऊ लागले आहे. दरवर्षी पावसामुळे पीक जोमात येत होते. यावर्षी वळिवाच्या पावसानेही पाठ फिरविली आहे. त्यामुळे ऊसपीकही पूर्णपणे खराब झाले आहे. एकूणच मोठ्या संकटात शेतकरी सापडला आहे. सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.









