मोदी-शहा यांची रणनीती ओळखली नाही कि विरोधकांचे पानिपत होते हे गेल्या आठ वर्षात बऱयाचवेळा दिसून आले आहे. त्याची अजून एकदा प्रचिती नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेश विधान परिषदेच्या निवडणूकात दिसून आली.
समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांना 36 पैकी बऱयाच जागांमध्ये भाजपशी तगडा मुकाबला करण्याची संधी होती ती त्यांनी आपले आपणच वाया घालवली. त्यांनी यापैकी जवळजवळ निम्म्या जागांमध्ये आपल्या यादव समाजाचेच उमेदवार दिल्याने भाजपने सहजगत्या फड मारला. विरोधी पक्षांच्या हाती भोपळा आला. 33 जागा भाजपला मिळाल्या तर उरलेल्या तीन अपक्षांनी जिंकल्या. ज्या अखिलेश यांनी गेल्याच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱयांशी जोरदार टक्कर दिली होती त्यांनी डावपेचात केलेली घोडचूक समाजवादी पक्षाच्या अंगलट आली.
पंतप्रधानांच्या वाराणसीमध्ये मात्र भाजपचा उमेदवार सणसणून आपटला पण तो पक्षाने अचानक कृपादृष्टी काढून घेतल्यामुळे असेच काहीसे दिसत आहे. वाराणसीमधून तुरुंगात असलेल्या एका बाहुबली विधायकाची बायको निवडून आली आहे. हा विधायक आणि त्याचे घराणे हे वाराणसीच्या काही भागातील बडे प्रस्थ असल्याने त्याला मदत करण्यात आली अशी कुजबुज आहे. भाजप पोथीनि÷ नाही. जो ‘उपयोगी’ तो आपला, हे सरळसरळ गणित.
ते काहीही असो. पण अखिलेश यादव यांना विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लगेचच दुसरा झटका बसला आहे. अखिलेश हे फक्त यादव आणि मुस्लिमांचे नेते आहेत असा प्रभावी प्रचार भाजपने एकीकडे सुरु केला आहे तर दुसरीकडे समाजवादी पक्षात बेदिली माजवण्याचा खेळ चालवला आहे. मुलायमसिंग यादव यांचे धाकटे भाऊ आणि अखिलेशचे काका असलेले शिवपाल सिंग यादव यांच्यामार्फत ही मोहीम सुरु झाली आहे. दहा वर्षापूर्वी मुलायमनी त्यांच्याऐवजी अखिलेशला मुख्यमंत्री केल्यापासून काका-पुतण्यात फारसे सख्य नाही. मुलायम यांची एक सून अपर्णा अगोदरच भाजपमध्ये गेलेली आहे. आता शिवपाल लवकरच भाजपाई बनतील असे दिसत आहे.
समाजवादी पक्षातील एक वादग्रस्त नेते आणि माजी मंत्री आझम खान तुरुंगात आहेत. त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी वाढत असल्याने आझम समाजवादी पक्षाला राम राम ठोकणार काय? अशी चर्चा सुरु झाली आहे. खान यांनी वेगळी चूल मांडली तर समाजवादी पक्षाचे मोठेच नुकसान होईल. सद्याच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात आझम खान हे पक्षाबाहेर पडले तर जाणार कोठे आणि करणार काय? असेही राजकीय जाणकार म्हणत आहेत. अखिलेश यांनादेखील हे माहित असल्याने पक्षातील मुस्लिम नेत्यांची ते फारशी फिकीर करत नाहीत.
दशकापूर्वी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असलेल्या बसपच्या मायावती या खरोखरच भाजपच्या ‘बी’ टीम बनल्या आहेत याची साक्षात पावतीच गेल्या आठवडय़ात राहुल गांधी यांनी दिली. मायावतींना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार मानून काँग्रेसने बसपाशी युतीचा प्रस्ताव ठेवला होता पण त्याला साधे उत्तर देण्याचे सौजन्यदेखील मायावतींनी दाखवले नाही. याचा अर्थ त्या ईडी, इनकम टॅक्स आणि सीबीआय च्या दबावाखाली आहेत असा राहुलचा आरोप आहे.
मायावतींवर टीका करून राहुल यांनी खरोखर काय साधले? असा प्रश्न पक्षांतर्गत विचारला जात आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसची किती दयनीय स्थिती आहे याची कबुली म्हणजे मायावतींसमोर ठेवलेला प्रस्ताव होय. काँग्रेसची एव्हढी खराब स्थिती होती तर मग प्रियंका गांधींना तिथे पूर्णवेळ जबाबदारी देणे कितपत बरोबर होते? 403 सदस्य असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेत बसपला एक तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत.
गुजरातमध्ये गडबड
जेव्हा कोणत्याही पक्षाचे केंद्रीय नेतृत्व दुबळे होते तेव्हा सुभेदार डोके वर काढतात हे राजकारणातील वास्तव आहे. काँग्रेसला त्याचे झटके मिळू लागले आहेत.
पुढील वषी मध्यप्रदेशमध्ये निवडणुका होत आहेत. तेथील स्थानिक नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आपलेआपण घोषित करून पक्षांतर्गत एक वादळ माजवले आहे. माजी मुख्यमंत्री असलेले कमलनाथ हे सध्या प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेता अशी दोन्ही पदे सांभाळत आहेत आणि कोणतेही एक पद सोडायचा त्यांचा विचार नाही असे त्यांचे समर्थक छातीठोकपणे सांगतात. दिग्वीजय सिंग यांच्यावर श्रेष्ठींची खप्पामर्जी झाली असल्याने कमल नाथ यांचे वजन वाढले आहे. अहमद पटेल यांच्या निधनानंतर कमलनाथ हे सोनियांचे खासमखास झाले आहेत असे सांगण्यात येते.
गुजरातच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत 182 जागांपैकी 150 जिंकण्याचा दावा करणाऱया भाजपला केवळ 99 वर काँग्रेसने गुंडाळले होते. राहुल यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा तो परमोच्च बिंदू होता. या वर्षअखेर गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. त्यात भाजपला कोणत्याही प्रकारचे आव्हान सध्यातरी दिसत नाही. आजच्या घडीला निवडणुका झाल्या तर काँग्रेसला फार काही जागा मिळणार नाहीत असे राहुल यांचे नि÷ावंत देखील म्हणत आहेत. प्रशांत किशोर यांना निवडणुकीची जबाबदारी द्यावयाची कि नाही या विषयावर पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंत दुभंगला आहे.
एकेकाळी राहुल यांच्या जवळचे समजले जाणारे हार्दिक पटेल देखील असंतुष्टांच्या गटात आहेत. पाटीदार समाजाचा काँग्रेस अपमान करत आहे असा त्यांचा आरोप आहे. खोडियार ट्रस्टचे नरेश पटेल हे पाटीदार समाजातील मोठे प्रस्थ काँग्रेसमध्ये सामील व्हायला निघाले आहे पण किशोर यांना सुपारी दिली तरच आपण पक्षात प्रवेश करू अशी त्यांची अट आहे. बराच काळ उपमुख्यमंत्री राहिलेल्या नितीन पटेल यांच्यासारख्या तालेवार नेत्याला भाजपने मुख्यमंत्री बनवले नाही म्हणून पाटीदार समाज नाराज आहे. सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे पाटीदार समाजातील असले तरी राजकारणात नवखे आहेत.
‘पंत मेले, राव चढले’, या उक्तीप्रमाणे काँग्रेसची गुजरातमध्ये झालेली दुर्दशा आम आदमी पक्षाच्या पथ्यावर पडली आहे. सोनिया गांधींचे उजवे हात समजले जाणाऱया अहमद पटेल यांच्या निधनानंतरची गुजरातमधील ही पहिली निवडणूक आहे. गमतीची गोष्ट म्हणजे अहमदभाईंचा मुलगा फैसल देखील केजरीवाल यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार असे बोलले जाते. पंचवीस वर्षाच्या अँटी-इनकमबन्सीचा सामना करायला भाजपने शक्कल लढवून आपला गुजरातमध्ये सक्रिय केले आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे. गुजरातमध्ये काँग्रेसची मते विभाजित करण्यासाठी केजरीवाल यांचा उपयोग करायचा आणि असे करून अलगदपणे सत्ता टिकवायचा भाजपचा बेत आहे.
सुनील गाताडे








