सतार, बासरी विभाग बंद : प्रशिक्षकांची नियुक्ती नाही; अनेक विद्यार्थी अडचणीत
विशेष प्रतिनिधी / पणजी
कला अकादमीच्या संगीत विभागाकडे उच्च दर्जाच्या प्रशासनकर्त्यांचे साफ दुर्लक्ष झाल्याने या विभागाची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विभागीय केंद्रे देखील प्रशिक्षकांअभावी ओस पडत आहेत. एवढेच नव्हे, तर अकादमीतील बासरी व सतार विभाग बंद पडले आहेत. अकादमीचा सदस्य सचिव आणि चेअरमन यांचे अकादमीच्या प्रशासनाकडे दुर्लक्ष झाले आहे. हे दुर्लक्ष बहुदा जाणूनबुजून केले जात असावे, अशा संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थीवर्गाकडून व्यक्त होत आहेत.
गेली दोन वर्षे कला अकादमी प्रकल्पाची दुरुस्ती रखडली आहे. अकादमीतील अगोदरचे साहित्य सध्या नेमके कशा अवस्थेत आहे, याबाबत शंका उपस्थित होत आहे. तसेच कलाकार मंडळी तीव्र नापसंती व्यक्त करीत आहेत. केवळ हिंदूस्थानी संगीत विभागाकडेच नव्हे तर पाश्चिमात्य संगीत विभागाकडे देखील दुर्लक्ष झालेले आहे.
सतार प्रशिक्षण विभाग बंद
कला अकादमीत सतारीचे प्रशिक्षण चालू होते. छोटे रहिमत खान हे निवृत्त झाल्यानंतर त्याजागी नवा गुरु नियुक्त केला नाही. गोव्यात सतारीचे प्रशिक्षण घेऊन रवींद्र च्यारी, योगीराज बोरकर असे अनेक नामवंत सतारवादक तयार झाले आहेत. नवा गुरु प्रशिक्षक नियुक्त न करता हा विभाग बंद करून टाकला आहे.
वाळपईत गायन वर्ग बंद
वाळपई येथे 25 ते 30 वर्षांपासून संगीत विभाग केंद्र सुरू होते. रामचंद्र नाईक हे डिसेंबर 2023 मध्ये निवृत्त झाल्यानंतर अजूनपर्यंत नव्या शिक्षकाची नियुक्ती केली नसल्याने हे केंद्र बंद पडल्यासारखे आहे. पालकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर देखील अद्याप या केंद्राकडे गांभीर्याने लक्ष देण्यासाठी मंत्री गावडे यांना वेळ मिळत नाही.
बासरी वर्गही अडचणीत
कलेच्या अभिवृद्धीसाठी तयार केलेल्या कला अकादमीकडे साफ दुर्लक्ष झालेले आहे. त्यातून मूळ उद्देशालाच लगाम घातलेला आहे. दयानंद मांद्रेकर हे कला व संस्कृतीमंत्री असताना तिथे बासरी वादनाचे प्रशिक्षण सुरू केले होते. सोनिक वेलिंगकर सारख्या बासरी वादकांनी अनेक विद्यार्थ्यांना तयार केले. वेलिंगकर हे गोवा संगीत महाविद्यालयात गेल्यानंतर रोहित वनकर यांची कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्यात आली. मात्र त्यांचे कंत्राट एप्रिल 2023 मध्ये संपुष्टात आल्यानंतर सध्या विद्यार्थी अडचणीत आले आहेत.
स्वरांगण महोत्सवही बंद
प्रशासकीय ज्ञानाचा अभाव असणाऱ्या काही अधिकाऱ्यांना अकादमीचे काहीही पडलेले नाही हे यावरून दिसून येते. चांगले विद्यार्थी असताना देखील बासरीचे वर्ग आणि सतारीचे वर्ग पूर्णत: बंद करून टाकलेले आहेत. विद्यार्थ्यांना व नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी दर महिन्याला होणारा स्वरांगण महोत्सवही बंद केला आहे. वेस्टर्न म्युझिक विभागाकडे होणाऱ्या कार्यशाळा देखील पूर्णत: बंद करून टाकलेल्या आहेत. त्यामुळे संगीतप्रेमींमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.









