बालकांना निकृष्ट दर्जाचा आहार, पालकवर्गातून तक्रारी : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ
वार्ताहर /किणये
कुद्रेमनी गावातील अंगणवाडी केंद्रात बालकांना निकृष्ट दर्जाचा आहार देण्यात येत आहे. तसेच या अंगणवाडीत अंड्यांचे वितरणही केले जात नाही. येथे सावळा गोंधळ सुरू असल्याच्या तक्रारी पालकांनी शुक्रवारी केल्या. प्रशासनामार्फत अंगणवाडी केंद्रामधून विविध प्रकारच्या योजना राबवून अंगणवाडीतील बालकांना अक्षराची ओळख मिळावी, सकस आहार मिळावा, यासाठी लाखो ऊपयांचा निधी खर्च करून योजना राबविल्या जातात. मात्र ग्रामीण भागात या योजना योग्यप्रकारे राबविल्या जातात का? असा सवाल कुद्रेमनी येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. कारण गावातील अंगणवाडी क्रमांक 103 मध्ये बराच सावळा गोंधळ सुरू आहे.
विद्यार्थ्यांना योग्य आहार मिळत नाही तसेच अंडी देण्यात येत नाहीत, अशा येथील स्थानिकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. अंगणवाडी क्रमांक 103 मध्ये शिक्षकांचे बालकांकडे दुर्लक्ष झाले आहे, येथे शिक्षिकच उपलब्ध नसतात. मग बालकांना शिकवणार काय? असा सवालही काही पालकांनी उपस्थित केला. अंगणवाडी केंद्रामध्ये शिक्षिका व एक सहाय्यक आहेत. शुक्रवारी गावातील काही पालकांनी अंगणवाडी केंद्राला भेट दिली. यावेळी शुक्रवार असूनही बालकांच्या ताटामध्ये अंडी नव्हती. याबाबत विचारले असता मुख्य शिक्षिका नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी प्रमिला कांबळे, आनंद बडस्कर, नामदेव बडसकर, नामदेव कांबळे, माऊती कांबळे आदींनी शुक्रवारी अंगणवाडीत जाऊन सदर आहाराची पाहणी केली. यावेळी आहारात निकृष्ट दर्जाचे अन्न आढळून आल्याने संताप व्यक्त होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी
माझी दोन मुले, एक मुलगा व एक मुलगी दोघेही अंगणवाडीला जातात. मंगळवारी मुलांना अंगणवाडीला पाठवून दिले होते. यावेळी निकृष्ट दर्जाचे भोजन मुलांना दिले होते ते मी पाहिले. तसेच मुलांना अंडीही देण्यात आली नव्हती. त्यावेळी विचारले असता, उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पुन्हा शुक्रवारी पाहणी केली असता मुलांच्या ताटामध्ये अंडी नव्हती. निकृष्ट दर्जाचा भात बनवून देण्यात आला होता. कोणत्याही प्रकारची भाजी नव्हती. सरकार जर असे अन्न बालकांना देत असेल आणि बालकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण? अंगणवाडी शिक्षिका अंगणवाडीत अधिक प्रमाणात गैरहजर असतात. विचारले असता ‘मिटींगला गेले आहेत,’ असे सांगण्यात येते. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी.
– एकनाथ कांबळे, कुद्रेमनी









