अचानक घेतला निर्णय
वृत्तसंस्था/ अमृतसर
एसजीपीसीचे प्रमुख हरजिंदर सिंह धामी यांनी स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वत:चा राजीनामा एसजीपीसी कार्यकारिणीला पाठविला आहे. अकाल तख्तचे जत्थेदार ज्ञानी रघवीर सिंह यांच्याकडून ज्ञानी हरप्रीत सिंह यांना चुकीच्या पद्धतीने हटविण्यावर करण्यात आलेली टिप्पणी राजीनाम्यासाठी कारणीभूत असल्याचे धामी यांनी सांगितले आहे.
श्री अकाल तख्त साहिबच्या जत्थेदाराच्या सन्मानार्थ मी राजीनामा दिला असल्यचे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे (एसजीपीसी) अध्यक्ष धामी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. नैतिक स्वरुपात एसजीपीसीला सिंह साहिबानच्या प्रकरणांच्या चौकशीचा पूर्ण अधिकार आहे, परंतु ज्ञानी रघवीर सिंह यांनी एसजीपीसीला सिंह साहिबानच्या बैठकीचा कुठलाही अधिकार नसल्याचे म्हणत आक्षेप घेतला आहे, याचमुळे मी नैतिक स्वरुपात स्वत:च्या पदाचा राजीनामा देत आहे असे धामी यांनी म्हटले आहे. हरजिंदर धामी हे 29 नोव्हेंबर 2021 पासून या पदावर विराजमान होते. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये प्रमुखपदाच्या होणाऱ्या निवडणुकीत त्यांनी सलग तीनवेळा विजय मिळविला होता. एसजीपीसी प्रमुख म्हणून त्यांचा हा चौथा वार्षिक कार्यकाळ होता. एसजीपीसी कार्यकारिणी आता बैठक घेत धामी यांचा राजीनामा स्वीकारावा का फेटाळावा याबद्दल निर्णय घेणार आहे. धामी यांनी पत्रकारांसमोर राजीनाम्याची घोषणा केल्यावर कुठलीही टिप्पणी करण्यास नकार दिला.
काही दिवसांपूर्वी एसजीपीसीने तख्त दमदमा साहिब, तलवंडी साबोचे (भटिंडा) जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांना हटविले होते. या निर्णयावर अकाल तख्तचे जत्थेदार ज्ञानी रघवीर सिंह यांनी टीका केली होती.









