वृत्तसंस्था /दुबई
ग्लोबल चेस लीगमधील एका ऐतिहासिक लढतीत ‘एसजी अल्पाईन वॉरियर्स’च्या मॅग्नस कार्लसनने विश्वनाथन आनंदला पराभूत करून संघाला स्पर्धेतील अव्वल स्थानावर नेऊन ठेवले आणि ‘गंगा ग्रँडमास्टर्स’ला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले. दुसरीकडे, पहिल्या सामन्यात ‘बालन अलास्कन नाइट्स’ने स्पर्धेत चांगली कामगिरी करून दाखविलेल्या संघांपैकी एक असलेल्या ‘मुंबा मास्टर्स’ला धक्का दिला. सगळ्यांचे लक्ष हे स्पर्धेत आघाडीवर असलेल्या ‘गंगा ग्रँडमास्टर्स’ आणि ‘एसजी अल्पाईन वॉरियर्स’ यांच्यातील दुसऱ्या लढतीवर होते. ‘गंगा ग्रँडमास्टर्स’ने खरे तर आघाडी मिळविली होती, पण ‘एसजी अल्पाईन वॅरियर्स’ने त्यांच्यातर्फे खेळणाऱ्या प्रज्ञानंदच्या जोरावर महत्त्वाच्या क्षणी उसळी घेण्यात यश मिळविले. त्यानंतर कार्लसनने विजय मिळवून गुणतालिकेवर आपला संघ आघाडीला पोहोचेल याची काळजी घेतली. दुसरीकडे, ‘मास्टर्स’विरुद्धची पहिली फेरी 14:5 अशा फरकाने जिंकलेल्या नाइट्सने सुरुवातीपासूनच दबाव घातला आणि ‘आयकॉन’ खेळाडू नापोम्नियाच्चीने मेक्सिम व्हेशियर लाग्रेव्ह याच्याविरुद्ध रोसोलिमो पद्धतीने आक्रमण केले. पण हा सामना तसेच तैमूर रादजाबोव्ह आणि विदित गुजराती यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला. कोनेरू हंपीवर तान झोंगयीने बराच दबाव टाकला होता, पण महत्त्वाच्या क्षणी झोंगयीने चुकीचा खेळ केल्याने हंपी अडचणीतून बाहेर पडू शकली. हरिका द्रोणावल्ली आणि निनो बातसियाशविल्ली यांच्यातील सामनाही बरोबरीत राहिला. ‘नाइट्स’चा ‘प्रोडिजी’ खेळाडू असलेल्या नागपूरच्या 17 वर्षीय रौनक सधवानीने उझबेकिस्तानच्या जोवोखीर सिंदारोव्ह याच्यावर मात केली, तर आलेक्झ्ा़ांडर ग्रिसचुकविरुद्धच्या चुरशीच्या सामन्यात नोदिरबेक अब्दुसत्तारोव्हने किल्ला ढासळू न दिल्याने नाइट्स संघाची 8-5 ने सरशी होऊ शकली.
मात्र ‘गंगा ग्रँडमास्टर्स’ विरुद्ध ‘एसजी अल्पाईन
वॉरियर्स’ ही सातव्या फेरीतील लढत सर्वांत लक्षवेधी राहिली. याचे कारण आनंद व कार्लसन या दोन माजी विश्वविजेत्यांच्या सहभागात होते. हे दोन्ही संघ भिडण्याची ही दुसरी खेप होती. पहिल्या सामन्यात गंगा ग्रँडमास्टर्सने एसजी अल्पाईन वॉरियर्सवर 11-6 ने विजय मिळविला होता. ताज्या लढतीत बराच काळ कुणाचेच पारडे जड नव्हते. मात्र रिचर्ड रॅपोर्टने सर्वप्रथम कोंडी फोडताना गुकेशला धक्का दिल्याने तसेच अर्जुन एरिगेसी व लिनियर डॉमिंग्वेझ यांच्यातील लढत बरोबरीत राहिल्याने गंगा ग्रँडमास्टर्स आघाडीवर गेले. माजी महिला विश्वविजेत्या हाऊ यिफानने आठ वेळची अमेरिकन विजेती इरिना क्रशला पराभूत केल्यानंतर प्रज्ञानंदने अँड्रे एसिपेन्कोला नमवून ‘वॉरियर्स’ला आशेचा किरण दाखवला.









