पोलीस महिलेचा पोलिसाविरुद्ध एफआयआर दाखल
बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून बेंगळूर येथील एका महिला पोलिसाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून मूळचा मुगळखोड, ता. रायबाग व सध्या बेंगळूर येथे राहणाऱ्या एका पोलिसाविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. बेंगळूर येथील ‘जीवन विमा’ नगर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. जे. पी. नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या आनंद पाटील या पोलिसाविरुद्ध भादंवि 406, 420, 417 कलमान्वये एफआयआर दाखल झाला असून स्वत: त्या पोलीस महिलेने ही माहिती दिली आहे. 25 ऑगस्ट 2022 ते 20 मार्च 2023 याकाळात सारा प्रकार घडल्याचे संबंधित महिलेने सांगितले.
आनंद पाटील (वय 29) हा मूळचा रायबाग तालुक्यातील मुगळखोडचा राहणारा असून सध्या बेंगळूरमध्ये पोलीस दलात सेवा बजावतो. कार्यालयीन कामकाजानिमित्त झालेल्या संभाषणानंतर पोलीस तरुणी व आनंद यांच्यात जवळीक निर्माण झाली. लग्नाचे आमिष दाखवून त्याने वारंवार आपले लैंगिक शोषण केल्याचे पोलीस महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. 20 मार्च 2023 रोजी एफआयआर दाखल करूनही अद्याप त्याच्यावर कारवाई झाली नसल्याचा आरोप पोलीस महिलेने केला आहे. या प्रकरणामुळे झालेल्या मनस्तापातून एकदा जीवन संपविण्याचाही प्रयत्न केला आहे, असेही त्या महिलेने सांगितले. आपल्यावर अन्याय झाला आहे. आपण न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचेही तिने सांगितले.









