महाविद्यालयीन तरुणीवरील बलात्कार प्रकरणी आरोपी दोषी; न्यायालयाकडून शिक्षा
सांगली : अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी राहुल मानसिंग चव्हाण (रा. झेरोना मळा, बोरगाव, ता. तासगाव) याला दहा वर्षे सक्तमजुरी शिक्षा सुनावली. या खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी दिला. आरोपीकडून वसूल करण्यात येणारी १६ हजारांची दंडाची रक्कम पिडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. या खटल्यात सरकारी वकील म्हणून आरती साटविलकर यांनी काम पाहिले.
दि. २२ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी पीडित तरुणी ही कॉलेजला जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी असताना आरोपी राहुल चव्हाण दुचाकीवरून तेथे आला. तुला कॉलेजला सोडतो, असे म्हणून त्याने तिला दुचाकीवर घेतले. पीडिता त्याच्यावर विश्वास ठेवून दुचाकीवर बसली. तासगावात आल्यानंतर मात्र त्यांनी तिला चारचाकीत बसण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला हातनूर परिसरातील जंगलात नेले
आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेने त्याच्या कृत्याला विरोध करत आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे या घटनेनंतरही पीडीतेने घडलेल्या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता केली नाही. १६ जून २०२० पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने तिची रुग्णालयात तपासणी केली त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आले.
याबाबत आई–वडिलांनी चौकशी केल्यानंतर पिडितेने आरोपीचे नाव सांगून घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास करून ९ ऑगस्ट २०२० रोजी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान सरकारी वकील आरती साटविलकर यांनी १४ साक्षीदारांच्या माध्यमातून घटनाक्रम आणि आरोपीने केलेले कृत्य न्यायालयाच्या समोर आणले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.








