कोल्हापूर प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन शस्त्राचा धाक दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ज्यादा सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.बी.तिडके यांनी आरोपी सचिन परशुराम पवते (वय 27 परिते ता करवीर) याला दहा वर्षे सक्तमजुरीसह दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मार्च 2018 मध्ये ही घटना घडली होती.
पिडित अल्पवयीन मुलगी करवीर तालुक्यातील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावी आर्टस शाखेत शिक्षण घेत होती. 15 मार्च 2018 रोजी सकाळी ती कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. दुपारी 12 बारा वाजता कॉलेज सुटल्यानंतर ती घरात येत असे. पण 15 मार्च रोजी ती घरी आली नाही. यामुळे नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. पण चार दिवस ती सापडली नाही. यामुळे तिच्या नातेवाईकांनी करवीर पोलीस ठाण्यात पिडितेचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर 4 एप्रिल 2018 रोजी करवीर पोलीसांनी पिडिताच्या नातेवाईकांना फोन करुन पिडित मुलगी पोलीसात हजर झाल्याची माहिती दिली. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जावून तिची विचारपूस केली असता आरोपी सचिन पवते यांने खोटे काम सांगून आहे असे सांगून फूस लावून पळवून वळीवडे येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरात चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचे पिडिताने सांगितले. यामुळे आरोपी पवते याच्याविरुध्द अपहरण, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. करवीर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक ए.एम.पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात पवते याच्याविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. 4 ऑक्टोबर 2023 रोजी ज्यादा सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.बी.तिडके यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी होऊन आरोपी पवते याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.या खटल्यात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, पिडित मुलगी आणि अन्य साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले. पैरवी अंमलदार सागर पोवार,महिला हेड कॉन्स्टेबल माधवी घोडके यांनी सहकार्य केले.