सांगली प्रतिनिधी
लग्नाचे अमीष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी लखन सुधाकर देवकुळे (30, वरचे गल्ली, साठेनगर, तासगाव) याला कोर्टाने 10 वर्षांच्या सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. कोर्टाने आरोपीकडून दहा हजाराचा दंडही वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्याचा निकाल जादा विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी मंगळवारी दिला.
न्यायालयातून मिळालेल्या माहितीनुसार, तासगावातील वरचे गल्लीतील साठेनगरमध्ये राहणारा आरोपी लखन देवकुळे याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली होती. त्याने तिला रिक्षातून निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर भिलवडी परिसरातही त्याने वारंवार हे कृत्य केले होते. 27 जुलै 2017 रोजी पीडित मुलगी घराला कुलूप लावण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी देवकुळे याने दुचाकीवरुन येवून तिला लगनाचे आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकारानंतर पीडितेच्या पालकांनी तासगाव पोलिसांत धाव घेऊन आरोपीविरुध्द फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुध्द सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन या गुह्याचा तपास तत्कालीन पोलीस अधिकारी प्रशांत कुंभार यांनी केला. सबळ पुराव्यांसह आरोपीविरुध्द खटला कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.
जिल्हा न्यायालयात जादा विशेष न्यायाधीश हातरोटे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. अरितिक्त जिल्हा सरकारी वकील माधव कुलकर्णी यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. त्यांना जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांचे सहकार्य लाभले. आठ साक्षीदारांच्या माध्यमातून कोर्टासमोर आलेला घटनाक्रम आणि आरोपीविरुध्द समोर आलेले पुरावे ग्राह्य मानून कोर्टाने आरोपीला 10 वर्षाच्या सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. यावेळी सरकारी पक्षाला सहाय्यक फौजदार शरद राडे, हवालदार माळकर, वंदना मिसाळ, सुप्रिया भोसले आदी पोलीस अंमलदारांचे सहकार्य मिळाले.