स्वच्छ करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी
बेळगाव : गाडेमार्ग, शहापूर येथे गटारी तुंबल्याने स्थानिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून ही समस्या कायम आहे. त्यामुळे तातडीने गटारींची स्वच्छता करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. शहरात स्वच्छतेबरोबर गटारींच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. तुंबलेल्या गटारींमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. आधीच इतर आजारांनी डोके वर काढले आहे. त्यातच गटारी तुंबल्याने इतर आजारांची भीती व्यक्त होऊ लागली आहे. स्थानिक नागरिकांकडून वेळेत कर भरण्यासाठी तगादा लावला जातो. मात्र, नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त होऊ लागला आहे. येथील गटारी स्वच्छ करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.









