नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर, इमारतींना धोका : नगरपंचायतीने जाणीवपूर्वक काम अर्धवट टाकल्याचा आरोप
खानापूर : खानापूर मारुतीनगर येथील सहाव्या आणि सातव्या गल्लीतील समस्यांनी वेढले आहे. नगरपंचायतीच्या अकार्यक्षमतेमुळे आणि दुर्लक्षामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गटारीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र गटारीचे काम अर्धवट राहिल्याने गटारीसाठी खोदण्यात आलेल्या चरीत होत असलेल्या पावसाचे पाणी साचून रस्ताही बंद झाला आहे. तसेच या खोल चरीत गेल्या दोन महिन्यांपासून पाणी साचून राहिल्याने इमारतीना धोका निर्माण झाला आहे. नगरपंचायतीने जाणीवपूर्वक काम अर्धवट टाकल्याचा आरोप मारुतीनगरवासियांकडून होत आहे.
मारुतीनगर येथील सहावी गल्ली परिसरातील गेल्या वीस वर्षापासून समस्या सोडविण्यासाठी येथील नागरिकांनी वारंवार नगरपंचायतीकडे अर्जविनंत्या केल्या होत्या. तसेच या ठिकाणी रस्त्याची सोय नसल्याने रस्ताही करून देण्याची मागणी केली होती. मात्र याकडे नगरपंचायतीने गेल्या वीस वर्षापासून साफ दुर्लक्ष केले आहे. गेल्या दि. 1 मार्चरोजी याबाबत मारुतीनगरवासियांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांना भेटून समस्यांबाबत निवेदन दिले होते. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तातडीने येथील समस्यांची पाहणी केली होती. आणि नगरपंचायतीला समस्या सोडविण्याबाबत सूचना केल्या होत्या.
मारुतीनगर येथील समस्या सोडवण्यासाठी विकास निधी मंजूर झाला आहे. मात्र सहाव्या आणि सातव्या गल्लीत जाणीवपूर्वक विकासकामे राबविली नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. आमदारांच्या सूचनेनंतर गटारकाम हाती घेण्यात आले. यासाठी चरही मारण्यात आली. मात्र गटारीचे काम अर्धवट राहिल्याने दीड महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाचे पाणी चरीत साचून रस्त्यावरुन तुडुंब भरून वाहत होते. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरुन चालणे कठीण झाले आहे. तसेच गेल्या दीड महिन्यापासून चरीत पाणी साचून राहिल्याने इमारतीना धोका निर्माण झाला आहे. पाणी साचल्याने इमारतींच्या पायालाच धोका निर्माण झाल्याने इमारती खचण्याचा धोका आहे.
इमारती कोसळण्याचा धोका
नगरपंचायतीकडे याबाबत वारंवार गटारीचे काम पूर्ण करण्याची मागणी करुनदेखील जाणीवपूर्वक गटारीचे काम हाती घेतलेले नाही. आता पावसाळा सुरू झाल्याने हे काम जर आणखी महिना दोन महिने याच अवस्थेत राहिल्यास इमारती कोसळण्याचा संभव आहे. तसेच या तयार करण्यात येणाऱ्या गटारीचे पाणी बाहेर काढण्यासाठी नियोजन नसल्याने नगरपंचायतीकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दक्षिणेकडील भागात असलेल्या शेतातून जमिनीतून पाईपद्वारे हे पाणी बाहेर काढल्यास गटारीला उतारही मिळणार आहे. मात्र नगरपंचायतीच्या नगरसेवक आणि अधिकाऱ्यांकडून या नियोजनाबाबत कोणताही निर्णय घेण्यात येत नसल्याने गटारीचे काम अर्धवट स्थितीत आहे. तातडीने चर मारुन तरी हे गटारीचे पाणी बाहेर काढणे आवश्यक आहे. तरी नगरपंचायीने त्वरित ही समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
आमदारांच्या सूचनेकडेही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
मारुतीनगर येथील समस्यांबाबत आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन नागरिकांनी समस्या सोडवण्याबाबत पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या भागाची पाहणी केली होती. आणि नगरपंचायत अधिकाऱ्यांना पाणी, गटार, रस्ता यासह विजेची समस्या सोडवण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र गेल्या तीन महिन्यापासून समस्या सोडवण्याबाबत नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केल्याने आमदारांच्या सूचनांचेही पालन केले नसल्याचा आरोप मारुतीनगरमधील सहाव्या गल्लीतील नागरिकांनी केला आहे.









